Sunday, August 9, 2015

सांगली जिल्ह्याची चित्रकारी

सांगली जिल्ह्याच्या चित्रकलेच्या परंपरेला विख्यात चित्रकार श्रीपाद गोपाळ ऊर्फ पंत जांभळीकर यांच्यापासून सुरुवात होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय ख्यातीप्राप्त झालेले ते कलावंत होते. त्यांच्यापासून सुरू झालेला हा कलाप्रवास अखंडपणे सुरू आहे. कला विश्व महाविद्यालय, कलापुष्प संस्था यांनी त्यासाठी धडपड सुरू ठेवली आहेपंत जांभळीकर यांचा जन्म 30 मार्च 1904 रोजी शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांचे सांगलीशी घनिष्ठ नाते होते. मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचे शास्त्रशुद्ध व अॅकॅडमिक शिक्षण घेतलेले पंत जिल्ह्यातील पहिले चित्रकार होते. सुरुवातीला त्यांचा मुंबईतच स्टुडिओ होता. मात्र मातीच्या ओढीतून ते सांगलीत आले. मॉडर्न आर्ट क्लासेस या नावाने मान्यताप्राप्त चित्रकलेचे वर्ग त्यांनी सुरू केले.

लोकसंस्कृतीचा ठेवा: वासुदेव

डोक्यावर शंकुच्या आकाराची मोरपिसांची टोपी, घोळदार अंगरखा, काखेत झोळी, कमरेला शेला, त्यात खोचलेली बासरी, पायात चाळ या वेशात रामप्रहरी ग्रामीण भागात येणार्या वासुदेवाचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. वासुदेव ही महाराष्ट्रातील पारंपारिक प्रयोशील लोककला. दान पावलं, दान पावल... म्हणत दारी येणारा वासुदेव आपल्या गीतातून कृष्णभक्तीचा महिमा गातो. त्या बरोबरच घरा-घरांतील बाप-लेकाचा , दुनियेचं वर्णन रसाळ वाणीद्वारे करतो. वासुदेवाचा हजार-बाराशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. एका ब्राम्हण जोतिष्यास कुणबी बाईपासून झालेल्या सहदेव नावच्या मुलापासून आपली उत्पत्ती झाली, असे वासुदेव सांगतात. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ या संतांनी वासुदेवावर रुपके केली. आद्य महानुभव वाड्मयातही याचे पुरावे आहेत. वासुदेव जातीने मराठा श्रेणीतले, परंतु त्यांच्या विशेष वृत्तीमुळे त्यांची वासुदेव स्वतंत्र जात मानली जाते.

रामप्रहरी गाव जागविणारा: पिंगळा जोशी

अंगात तीन बटनी शर्ट. त्याच्यावर कोट, धोतर, डोक्यावर पटका, पटक्याला चंद्रकोर, एका हातात कंदील व दुसर्या हातात कुडमुडे. काखेत झोळी अशा वेशात भल्या पहाटे दारात येऊन भविष्य कथन करणारा पिंगळा जोशी. ही एक भटकी जमात आहे. यांनाच कुडमुडे जोशी म्हणतात. पहाटेच्या वेळी झाडावर पक्षी बोलतो. त्या पक्षाची भाषा समजून हा जोशी भविष्य कथन करतो, असा समज आहे. त्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात.