Thursday, February 11, 2016


सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डे धूम
  जत,(बातमीदार): आपल्या प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. या दिवशी त्या खास व्यक्तीसाठी काय करू आणि काय नको असे काहींना झालेले असते. कोणी टेडी बेअर्स, बदामाच्या आकारातील फुगे, केक, चॉकलेट्स देऊन आपले प्रेम व्यक्त करते, तर ज्यांना त्या दिवशी भेटणे शक्य नसते त्यांना मेसेजेसमधून आपले प्रेम व्यक्त करावे लागते. अशाच अनेक प्रेमाच्या मेसेजेसनी, फोटोजनी तरुणाईच्या व्हॉट्स ऍपचे इनबॉक्स सध्या भरलेले दिसत आहेत. इंटरनेटवर म्युझिकल ई ग्रिटींग्ज, लव्ह कोट्स, वेगवेगळी गाणी असलेले व्हिडीओ उपलब्ध झाल्याने प्रिय व्यक्ती आपल्या सोबत नसली तरीदेखील आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहचवणे सहज शक्य झाले आहे. सध्या या दिवसाशी निगडित अनेक विनोदही व्हॉट्स ऍप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर फिरत आहेत. यामध्ये आता टेडी डे, चॉकलेट डे, रोझ डे सारख्या दिवसांची भर पडल्याने रोज एक नवीन मेसेज ग्रुप्सवर फिरताना पाहायला मिळत आहे. एरवी त्या व्यक्तीला कधी एकदा भेटून प्रेम व्यक्त करेन अशी अवस्था असलेले तरुण-तरुणी या मेसेजेस, फोटोज, कोट्समध्ये अडकल्याने प्रेम व्यक्त करण्याची एक नवीन पद्धत तरुणाईमध्ये रूळताना दिसत आ

 ’डार्लिग डोन्ट चिट’ सिनेमा वादात, ट्रेलर पाहून विरोध वाढला
  जत,(बातमीदार); वादग्रस्त सिनेमा डार्लिंग डोन्ट चिटला उत्तरप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतो आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हा वाद वाढण्यास सुरुवात झाली आहे. या सिनेमात महिलांसंबंधित असभ्य चित्रिकरण करण्यात आले असून सिनेमातील अनेक दृश्य देशाच्या परंपरेला आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहेत. डार्लिंग डोन्ट चीटचं दिग्दर्शन राजकुमार हिंदुस्थानी यांनी केलं असून यामध्ये राम गौरव पांडे, आशिष त्यागी आणि नेहा चॅटर्जी यांची प्रमुख भूमिका आहे. येत्या 11 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होत आहे.
 कर्नाटकाविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका
 जत: धारवाड आणि बंगळूर उच्च न्यायालयाकडून सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्र देण्याचा निकाल देऊनही त्याचे पालन न करणारे जिल्हाधिकारी एन. जयराम यांच्याविरोधात धारवाड उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. माजी आमदार मनोहर किणेकर, जिल्हा पंचायत सदस्या प्रेमा मोरे आणि तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कणबरकर यांनी हा दावा प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर केला आहे. सरकारी अध्यादेश, निविदा, परिपत्रके आणि माहितीपत्रके मातृभाषेतून मिळणे हा हक्क आहे, तरीही तो मिळत नसल्यामुळे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी धारवाड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेचा निकाल 18 नोव्हेंबर 2013 रोजी लागला. यात मराठीतून कागदपत्र देण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, खानापूर तालुका पंचायत प्रशासनाला दिला आहे. पण, त्याचे पालन झाले नाही. त्यामुळे किणेकर यांच्यासह तिघांनी अधिकार्‍यांविरोधात 25 जानेवारी 2016 रोजी अवमान याचिका दाखल केली आहे. कर्नाटक लोकल ऑथॉरिटी (ऑफिसिएल लँग्वेज) ऍक्ट 1981 नुसार 15 टक्क्याहून अधिक कन्नडेत्तर भाषिक एका भागात असतील तर त्या भाषेतून सरकारी कागदपत्र देणे बंधनकारक आहे. सरकारच्याच 1981 च्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे 1995 ला श्री किणेकर आणि बाबूराव पिंगट यांनी बंगळूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 6 फेब्रुवारी 2001 रोजी न्यायमूर्ती पी. व्ही. रेड्डी, न्यायमूर्ती के. एल. मंजुनाथ खंडपीठाने निकाल दिला. त्यातही मराठीतून कागदपत्र देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 2002 ला परत श्री किणेकर व पिंगट यांनी अवमान याचिका दाखल केली. त्यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या वतीने अंजुम परवेझ यांनी उच्च न्यायालयात मराठीतून कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिज्ञापत्र (अफिडेव्हिट) सादर केले. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने किणेकर, प्रेमा मोरे, यल्लाप्पा कणबरकर यांनी परत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने 18 नोव्हेंबर 2013 रोजी दाव्याचा निकाल काढून मराठीतून कागदपत्र देण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिला. नोटीस पाठवूनही दाव्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे 25 जानेवारी 2016 रोजी अवमान याचिका दाखल केली आहे. ऍड. महेश बिर्जे आणि ऍड. दीपक कुलकर्णी काम पाहत आहेत. सीमाभागात मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे मिळणे हा त्यांचा हक्क आहे; पण आकसापोटी सरकार आपलाच आदेश नाही. आम्ही रस्त्यावरील आंदोलन करून त्यांच्याकडे मागणीकरूनही निवेदनांना केराची टोपली दाखविली जाते. त्यामुळे त्यांना न्यायालयाच्या भाषेतच उत्तर देण्यात येणार आहे. असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले.

 रेशनकार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करा : बापट
 मुंबई: येत्या 31 मार्चपर्यंत शंभर टक्के पूर्ण करा, अशा सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी येथे दिल्या. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची एक दिवसाची राज्यस्तरीय आढावा बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री गिरीश बापट बोलत होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस राज्यमंत्री विद्या ठाकूर, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, जिल्हाधिकारी सौरभ राव, उपसचिव सतीश सुपे आदी उपस्थित होते. बापट यांनी सांगितले की, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग समाजाच्या गरीब आणि सर्वसामान्यांशी निगडित आहे. समाजाच्या या घटकाला चांगली सेवा देणे, त्यांना वेळच्या वेळी अन्नधान्य उपलब्ध करू देण्याच्या कामास प्राधान्य दिले पाहिजेच. त्याचबरोबर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी बदल करण्याची आवश्यकता आहे. रेशन कार्डवरील अन्नधान्याचे वितरण अतिशय योग्यरीतीने आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रेशनकार्ड आणि आधार कार्डशी संलग्न करण्याची आवश्यकता आहे. याबाबतचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असल्यामुळे राज्यात मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के रेशन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी संलग्न होण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा रेशनिंग समितीवरील सदस्यांची मदत घ्यावी, अशा सूचना मंत्री बापट यांनी केल्या. अन्नधान्य योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विभागाच्या कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहे.

 कॉंग्रेसच्या माजी आमदाराचा थाट मुलाच्या लग्नात वारेमाप खर्च
 औरंगाबाद : मराठवाडा नव्हे दुष्काळवाडा.. पाणी नसल्याने लोकांनी घरे सोडली.. मुलांची शाळा थांबली.. गुरेढोरे अर्धपोटी राहिली.. वर्षभरात 1 हजारावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. याच मुद्द्यावरुन कालपर्यंत सत्तेत असलेल्यांनी आंदोलने केली.. दुष्काळ परिषदा घेतल्या. पण त्यांची ही संवेदनशीलता किती बेगडी आहे, याचा अनुभव परभणीत आला आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुखांनी आपल्या मुलाच्या लग्नात करोडो रुपयांची उधळण केली आहे. तिरुपतीत झालेल्या या लग्नासाठी वर्‍हाड चक्क एसी ट्रेनने तिरुपतीला नेले. जाताना वर्‍हाड्यांना पॅराडाईजची बिर्याणी आणि बाकीची सोयसुद्धा होती. तिरुपतीत 2 दिवस फाईव्ह स्टार सोईसुविधांसह मुक्काम झाला. मंदिर देवस्थानला घसघशीत देणगी दिली. परत आल्यावर परभणीकरांसाठी खास रिसेप्शन झाले. ज्यात लावणीसम्राज्ञींवर पैशांची उधळण झाली. खाण्यापिण्यावर आणि सजावटीवर झालेल्या खर्चाची तर मोजदादही नाही. त्यामुळे रोज दुष्काळावरुन सरकारला घेरणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांचे अश्रू दिखाऊ असल्याचे अधोरेखित झाले.


 हळदी-कुंकू समारंभात वाटल्या नळाच्या तोट्या
 विटा :  शहरासह खानापूर तालुक्यात दुष्काळामुळे पाण्याची बिकट अवस्था आहे. उपलब्ध पाणी वाया जाऊ नये, यासाठी येथील श्री महिला बचत गट आणि आम्ही मराठी महिला ग्रुपनी सामाजिक बांधिलकी जोपासत हळदी-कुंकू समारंभात वाण म्हणून नळाच्या चाव्या दिल्या. या उपक्रमाचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. खानापूर तालुक्यात सध्या दुष्काळामुळे पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. ही टंचाई लक्षात घेऊन येथील श्री महिला बचत गट आणि आम्ही मराठी महिला ग्रुपनी जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत येथील महिलांना मकर संक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात वाण म्हणून पाणी वाया जाऊ नये म्हणून नळाच्या चाव्या (तोट्या) दिल्या आहेत. यामुळे वाचलेल्या पाण्याचा फायदा इतरांना होईल, असा संदेश या समारंभातून दिला आहे.No comments:

Post a Comment