Tuesday, December 27, 2016

ड्रिंक ऍण्ड ड्राईव्हवर पोलिसांची राहणार नजर


जत,(प्रतिनिधी)-
सरत्या वर्षाल निरोप देण्यासाठी आणि थटी फस्टचा जल्लोष करण्यासाठी अनेक तरूण मद्यधुंद होउन. वाहन चालवित असतात. अशांच तळीरामांवर चाप बसविण्यासाठी आता जत पोलिसांनी ड्रिंक ऍण्ड ड्राईव्हवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासठी नुकतीच ड्रिंक ऍण्ड ड्राईव्हची मशिनदेखिल जत पोलिसांत दाखल झाली आहे.
   याच पार्श्वभूमीवर आता मोठया प्रमाणावर मद्यधंद होउन वाहन चालविणा-यावर कारवाई होणार आहे. यासाठी या मशिनव्दारे मद्यधुंद चालकांच्या तोंडामधे या मशिनचा एक फुटाचा असणारा पाईप तोंडाधे देउन त्याव्दारे चालकांने किती प्रमाणात मद्य प्राशन केले आहे. याचा अंदाज येतो. आणि यातून संबधित चालकांचा अहवाल तयार केला जात असतो.
 डिंक ऍण्ड ड्राईव्ह मशिनने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकांचा दिलेला अहवाल हा न्यायालय देखिल ग्राहय धरते. यास न्यायालयांमधे किमान 5 हजार रूपयाचा दंड आणि तत्सम शिक्षा देखिल होउ शकते. त्यामुळे वाहन चालकांनो सावधान संपूर्णपणे शुध्दीत राहूनच शहरातून आणि खास करून थर्टी फर्स्टला वाहन चालवणे क्रमप्राप्त आहे. आता ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह ची मशिन आणून कारवाई सुरू केल्यानंतर आगामी काळामधे वाहतुकीला शिस्त लावण्यासंबधी पोलीस अजूनच सक्षम होणार आहेत.

अहो साहेब, आमचे पैसे तरी आम्हाला द्या!
जत,(प्रतिनिधी)-
गेल्या 50 दिवसापासून सुरू असलेल्या नोटबंदीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला पडला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी बँकामध्ये मूबलक पैसेच उपलब्ध नसल्यामुळे ग्राहाकांची आर्थिक कोंडी सुरू झाली असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खूपच अडचणीत आलेली आहे. अहो साहेब, किमान आमचे पैसे तरी आम्हाला द्या, अशी आर्त टाहो फोडीत महिला, पुरुषांसह वयोवृद्ध नागरिक सुद्धा बँकेच्या व्यवस्थापकांना विनवणी करताहेत.
जत तालुक्यातील विविध अशी बँकामध्ये दिसून येत आहे. बँकेच्या ग्राहकांना पैशांअभावी पुरेशी सेवा पुरविता येत नसल्याने बँकेचे कर्मचारीही हतबल झालेले दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदीच्या धाडसी निर्णयाने एका बाजुला स्वागत होत असले, तरी बँकाना नवीन नोटाचा मुबलक पुरवठा होत नसल्याने आता नोटबंदी एक डोकेदुखी झाली आहे. 500 1000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा होताच गरीबांकडे असलेल्या संरक्षित पैसा बँकेत जमा झाला. मात्र आता गरजेच्या वेळी पैसे मिळेनासे झाल्याने दैनंदिन व्यवहार अडचणीत आले आहे.
जत तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँक, अर्बन बँक,स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र,बँक ऑफ बडोदा व संपूर्ण तालुक्यात हे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर याची खाते कमी प्रमाणात असून तालुक्यात पतसंस्था सह. बँक तसेच पतसंस्थेत अधिक खाते आहेत. अशा वेळी अशा संस्थातून ग्राहकांना पैसे देणे गरजेचे आहे.मात्र राष्ट्रीयकृत बँक सह. बँकांकडे सापत्निक व्यवहार करीत असल्याचा आरोप सुद्धा होतो. आजमितीस तालुक्यात शेतकर्याअभावी दैनावस्था झाली. जत तालुक्यात अनेक बँकासमोर गर्दी तर बँक समोर रांगा लागल्यात तर ग्राहाकचे पैसे जमा आहेत. आपलेच पैसे काढण्यासाठी महिला, पुरुषासोबत वयोवृद्ध सुद्धा सकाळपासून बँकेत रांगा लावत आहेत. मात्र त्यांच्या हातात फक्त हजार,पाचशे  किंवा दोन हजार रुपये दिले जात आहेत. अनेकदा पैसे नाहीत म्हणून वापस पाठविल्या जात आहेत. अशावेळी अहो साहेब आमचे पैसे तरी आम्हाला द्या अशा विनवण्या बँकेच्या अधिकार्यांना करतानाचे चित्र जत तालुक्यात पाहावयास मिळत आहेत.
नोटाबंदीचा एकीकडे स्वागत होत असला, तरी त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला आहे. लहान मोठे व्यापार ठप्प झाले असून आर्थिक झळ व्यापार्यांना सोसावा शासन कॅशलेस व्यवहार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करीत असले, तरी ग्रामीण भागातील अशिक्षित तसेच अल्प शिक्षित हा व्यवहार कसा काय यासाठी तोठया प्रमाणावर जनजागृती करावी लागणार आहे.

म्हैसाळच्या पाण्यासाठी डफळापूरमध्ये रास्ता रोको
जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी सोडावे, तसेच म्हैसाळ योजनेस शासनाने तातडीने निधी द्यावा, या मागणीसाठी डफळापूर येथे प्रा. रणजीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनास पाठींबा म्हणून गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
 डफळापूर स्टँड परिसरात जत-सांगली या महत्वाच्या रस्त्यावर मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतुुकीची मोठी कोंडी झाली. पाण्यासाठी घोषणा देत आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या मारला. त्यामुळे जतहून सांगलीकडे व सांगलीहून जतकडे येणारी वाहतुक ठप्प झाली. ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, सुभाषराव गायकवाड, शेतकरी संघटनेचे दिनकर संकपाळ, रमेश शिंदे, बाळासाहेब पाटील, राजाराम शिंदवडे यांच्यासह अनेक शेतकरी, व्यापारी आंदोलनात सहभागी झाले होते.

कॉलेजकुमारांच्या मोबाईलमध्ये सर्रास अश्लिल चित्रफिती
जत,(प्रतिनिधी)-
सांगली शहरातल्या  एका महाविद्यालयातकॉलेजकुमारांच्या मोबाईलवरीलडाटातपासण्यात आला. त्यामध्ये 9 विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर अश्लील मजकूर-क्लिप्स मिळून आल्या.मात्र अशा चित्रफिती सर्रास युवकांच्या मोबाईलमध्ये आढळून येतात.याबाबत सर्वच महाविद्यालयाने तपासणी करून कॉलेजकुमारांवर धाक ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.
 ॠांगलीतल्या एका  महाविद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉलेज प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे मोबाईल तपासण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांकडे वादग्रस्त मेसेज व अश्लिल क्लिप्स होत्या, त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल लॉक करून त्यासाठी पासवर्ड टाकल्याचे आढळून आले. त्यांना संबंधित महाविद्यालयाचे प्रशासन व पोलिस  अधिकार्यांनी  फैलावर घेतल्यावर चुका कबूल केल्या.
 मात्र अशा प्रकारचे अश्लिल चित्रफिती सर्रास कॉलेजकुमारांच्या मोबाईलमध्ये आढळून येतात. युवा पिढी ती झाकून पाहत असते. त्याच्यावर चर्चा करत असते. कोणती चांगली क्लिप आहे, ती मला पाठवअशी संभाषणे सर्रास कॉलेज कट्ट्यावर पाहायला मिळतात. कॉलेजच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने या प्रकाराला अटकाव करण्याची गरज असून त्यांना जनजागृती करण्याचीही गरज आहे. अशा प्रकारामुळे भविष्य कसे बरबाद होते, हे सांगण्याबरोबरच अभ्यासाकडे लक्ष देण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे.
 आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कष्ट, जिद्द, सततचा अभ्यास, परिश्रम, चांगली कामे; यासंदर्भात कुटूंबातील व समाजातील दैनंदिन अनुभवाद्वारे सविस्तर विवेचन करण्यात यायला हवे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व वरिष्ठ  कर्मचारी यांनीही पुढाकार घ्यावा.
  पालकांना असे महागडेथ्री-जी, फोर-जीमोबाईल विद्यार्थ्यांना का देता, पालकांनीही काय दक्षता घ्यावी, याविषयी समुपदेशन करण्यात यायला हवे आहे. सध्या सर्वत्रचव्हॉटस्अॅपग्रुप, फेसबुकद्वारे चांगल्या व समाज प्रबोधनपर उपदेश-चित्रफितींबरोबर वादग्रस्त, देश विघातक, धार्मिक भावना भडकाविणार्या तसेच अश्लिल चित्रफिती फिरत असल्याचे चर्चेत आहे. त्यामध्ये कॉलेजकुमारांचा वाढता वावर असून तो संभाव्य गुन्हेगारीची तीव्रताही वाढविणारा ठरत आहे. पालकांनीदेखील आपापल्या पाल्यांच्या मोबाईलवरीलफोटो, व्हिडीओ, कॅमेरा, -मेल, फेसबुक, व्हॉटस्अॅप, बॅकअप व रिश्टोअर, मेसेजअशी सर्व फोल्डर्स अधूनमधून तपासून वादग्रस्त प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे.Friday, December 23, 2016

जतची यल्लमा यात्रा मोठ्या उत्साहात सुरूहजारो भाविकांनी फेडला नवस;लाखभर भाविकांनी घेतले दर्शन
जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.काल यात्रेच्या मुख्य दिवसातील पहिला प्रमुख दिवस.हजारोंच्या संख्येने भाविकांनी गंध लेवून देवीची ओटी भरली व आपला नवस फेडला. काल दिवसभरात लाखभर भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.
नवसाला पावणारी देवी म्हणून श्री यल्लमाची सर्वदूर प्रसिद्धी आहे. आपले कार्य विनासायास सफल व्हावे म्हणून भाविक देवीला नवस बोलतात. आपली कार्यसिद्धी झाल्यास या दिवशी भाविक देवीच्या दारात येऊन नवस फेडतो.येथील कुंडात स्नान करून भक्तीभावाने देवीची ओटी भरली जाते.काल हजारोंच्या संख्येने भाविकांनी आपला नवस फेडला.
यात्रा स्थळावर भाविकांची मोठी गर्दी होत असून भाविक लाखोच्या संख्येने दाखल होत आहेत.जत तालुक्यासह मुंबई,पुणे, बेंगळूर, बेळगाव, धारवाड,इंडी,बिदर,सोलापूर आदी परिसरातील भाविक मुक्कामाला येत असतात. तीन दिवस मुक्काम करत दुसर्‍यादिवशी देवीला नैवेद्य दाखवून झाल्यावर तिसर्‍यादिवशी  किच पडल्यानंतर भाविका यात्रा स्थळ सोडतात. जवळपास चार लाखाहून अधिक भाविक यात्रेला हजेरी लावत असते. यात्रा स्थळावर मेवा-मिठाईच्या दुकानांसह सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तू,गरम लोकरीचे कपडे,खेळणी, हॉटेल्स,चायनीज पदार्थ,रसवंतीगृहे आदींची दुकाने,स्टॉल्स थाटली गेली आहेत. करमणुकीच्या साधनांमध्ये पाळणे,डिज्नेलँड,मौत का कुआ,जादूगार,तमाशे दाखल झाले आहेत.यंदाच्या यात्रेवर नोटाबंदीचा कुठलाच परिणाम दिसून येत नाही. उलट यंदा गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक मोठी यात्रा भरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेच्यावतीने प्रथमच कृषी महाप्रदर्शन भरवण्यात आले आहे. आर. आर. पाटील यांच्या नावाने कृषी प्रदर्शन भरवण्याचे योजले असले तरी त्यांचा उल्लेख अजिबात दिसत नाही. उदघाटन पत्रिकेमध्येदेखील जिल्हा परिषदेला व आर. आर.पाटील यांच्या प्रतिमेला स्थान दिले गेले नसल्याने जिल्हा परिषदेने या प्रदर्शनाचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खास बाब म्हणून निधी देण्याचे कबूल केले आहे. प्रदर्शनावर भाजपाची छाप ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 
नेहमीप्रमाणे सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जनावरांचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रा स्थळावर भाविकांसाठी पिण्यासाठी व स्नानासाठी कुंडात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

संजना व्होनमोरे हिची राष्ट्रीय रिंगबॉल संघात निवड


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बेळोंडगी येथील एम.जी.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु.संजना मल्लिकार्जून व्होनमोरे हिची राष्ट्रीय रिंगबॉल संघात निवड झाली आहे. तिने सहभाग घेतलेल्या महाराष्ट्र संघाने बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे. जतसारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागात राहून तिने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कु.संजना ही इयत्ता 9 वीत शिकत असून तिच्या उत्तम कामगिरीमुळे तिने अल्पावधीतच महाराष्ट्र राज्याच्या रिंगबॉल संघात स्थान पटकावले. कबड्डी,धावण्याच्या व गोळाफेक स्पर्धांमध्ये तिची कामगिरी उल्लेखनिय आहे. तिच्या कामगिरीमुळे आणि  के.एम.हायस्कूल येथील क्रीडाशिक्षक विजय बिराजदार, एम.जी.हायस्कूलचे क्रीडाशिक्षक चिक्कलगी,तोरणे यांच्या प्रयत्नामुळे तिला तालुका रिंगबॉल संघात स्थान मिळाले.तिने आपले कौशल्य पणाला लावून यात मोठी कामगिरी करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे तिची सांगली जिल्हा रिंगबॉल संघात निवड झाली. इथेही तिने आपल्या कामगिरीची चुणूक दाखवली. सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगलीच्या संघाने विजेतेपद पटकावले.
नंतर तिची निवड राज्याच्या रिंगबॉल संघात झाली. नुकत्याच आंतरराज्यीय रिंगबॉल स्पर्धा बेंगलोर येथे पार पडल्या.या स्पर्धेत तिचा सहभाग असलेल्या राज्याच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर.सी.होर्तीकर, सचिव एस.के.होर्तीकर,मुख्याध्यापक यु. आर. माळी आदींनी तिचे अभिनंदन केले. शाळा आणि ग्रामस्थांनी तिची बेळोंडगी गावातून सवाद्य मिरवणूक काढली.
कु.संजना व्होनमोरे हिला पहिल्यापासून खेळाची  आवड आहे. तिच्या उत्साहामुळे ती सातवीत असताना मुलींचा कबड्डीचा संघ तयार झाला. तिच्या कामगिरीवरच पहिल्याच प्रयत्नानत या संघाने तालुका स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला होता. तिची खेळाविषयीची आवड पाहून मुख्याध्यापक श्री. माळी यांनी क्रीडाशिक्षक चिक्कलगी, अधिक्षक व राष्ट्रीय खेळाडू तोरणे सर आणि कर्की सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिला सराव देण्यात आला. रोज दोन किलोमीटर ती धावत असते. कबड्डी,गोळाफेक आणि धावण्याच्या स्पर्धेतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.तिला तिच्या आई-वडिलांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळाले. तिचे वडील मल्लिकार्जून व्होनमोर शिक्षक आहेत.

Thursday, December 15, 2016

सावधान... सांगाल तर फसाल!


लॉटरीनंतर आता‘ एटीएम ब्लॉक ’चा फंडा; मोबाईलवरून विचारणा केल्यास क्रमांक सांगू नका
जत,(प्रतिनिधी)-
‘तुम्हाला एक लाख पौंडाची लॉटरी लागली आहे’, या फसवणुकीच्या प्रकारानंतर आता गावागावांतही  'हॅलो,तुम्हारा एटीएम ब्लॉक होनेवाला है’ असे फोन येऊ लागले आहेत... तेव्हा सावधान! तुमच्या बँक खात्यावरील पैसे लाटण्याचा हा परप्रांतीय लुटारूंचा धंदा असू शकतो.
जत तालुक्यातील अगदी खेडेगावातल्या लोकांना असे फोन येऊ लागले आहेत.गेल्या आठ दिवसांत असे अनेक फोन आले आहेत. फोन करणारे हिंदी भाषिक व्यक्ती आहेत. तालुक्यातील दरिकोणूर येथील प्राथमिक शिक्षक बाबासाहेब पांढरे यांना तसेच उटगी येथील उर्दू शाळेत कार्यरत असणारे शिक्षक पटेल यांनाही अशा प्रकारचे फोन आले आहेत.त्यांना मोबाईलवर बोलणारी व्यक्ती ‘ भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेन ब्रँचमधून  बोलत असून तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते पुन्हा सुरू करायचे असेल तर तुमच्या क्रेडिट/ डेबिट कार्डवरील क्रमांक सांगा’ असा आग्रह करीत होते. पांढरे यांनी आपल्याला यातले काही कळत नाही.तुम्हाला नंतर सांगतो, असे सांगून फोन केला. नंतर त्यांनी एटीएममध्ये जाऊन पैसे काढले. पैसे निघाले. त्यामुळे त्यांना कुणीतरी आपल्याला फसवत आहे, असा संशय आला. त्यामुळे त्यांनी नंतर त्याचा फोन स्वीकारला नाही.
उटगी येथील पटेल यांनाही असाच अनुभव आला. मात्र पलिकडून फोनवरून बोलणारी व्यक्ती बिहारी असल्याचा संशय आला. त्याची त्यांनी फिरकी घेतली.पलिकडच्या व्यक्तीला ते लक्षात आल्यावर त्याने पटेल यांना जोराची शिवी हासडली. शिक्षकांनी त्याला शिवीगाळ केली. व फोन बंद कर नाहीत तर पोलिसांत तक्रार देतो असे सांगत त्याचे बोलणे रेकॉर्ड केल्याचेही सांगितले. मात्र त्या पलिकडील निगरगठ्ठ माणसाने खुशाल तक्रार जा, असे सांगतानाच जो तो मला असेच म्हणतो, मात्र तक्रार कोणी करत नाही, असाही निर्ल्लजपणे म्हणाला.
बँक खातेदाराला एटीएमचा क्रमांक मागून परप्रांतीय भामटे त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत शहरी भागात एटीएमच्या नावाने फसवणूक करणार्‍या भामट्यांनी शहरातील लोक जागृत झाल्याने आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे. हे भामटे मोबाईलवरून संभाषण करून कार्डवरील कार्डवरील क्रमांक घेऊन सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बनावट एटीएम कार्ड तयार करून त्याद्वारे एटीएममधून खात्यावरील पैसे परस्पर काढत असल्याच्या घटना शहरी भागात घडल्या आहेत. आता ग्रामीण भागातही हे प्रकार घडू लागले आहेत.त्यामुळे अशा प्रकारच्या फसव्या कॉलपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणतीही राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँक अशा प्रकारच्या एटीएम कार्डाबाबत माहिती घेणारी वेगळी यंत्रणा नेमत नाही. त्या खातेदारांचे पासवर्ड तीच बँक देत असल्याने तो डाटा पूर्वीच बँकेत असतो, त्यामुळे बँकेच्या नावाखाली चोरटे फसवणूक करीत असल्याने अशांना कोणतेही क्रमांक सांगू नयेत, असे आवाहन बँकांनी केले आहे. शिवाय बँका आपल्या खातेदारांना अशा प्रकारचा मेसेज वारंवार करत असते. खातेदारांनी मेसेज वाचावेत, असेही सांगण्यात आले.

जत साखर कारखाना राजारामबापूने बंद ठेवला


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या विकासाचा मानबिंदू असणारा जतचा डफळे कारखाना सभासदांच्या मालकीचा होण्याचे संकेत मिळत असले तरी या कारखान्याला लागलेले ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे. राजारामबापू साखर कारखान्याने खरेदी केलेले हे युनिट चालू गळीत हंगाम अवघ्या बारा दिवसात बंद ठेवला आहे. उसाची टंचाई, झोनबंदीच्या नावाखाली कारखाना बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी यामागे वेगळी कारणे असल्याचे आता समोर येत आहे. सद्यस्थितीला कारखान्यावर असणारी स्टॉक साखर उचलण्यास प्रारंभ झाला असून, कारखान्याची मशिनरी खोलण्यात येत आहे.
सततचा दुष्काळ, बँक कर्जे, उसाची कमतरता यामुळे जतचा राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना आर्थिक डबघाईला आला होता. तसेच राज्य शिखर बँकेचे कारखान्यावर कर्जे असल्याने अखेर तो पाच वर्षापूर्वी लिलावात निघाला. या लिलाव प्रक्रियेत इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी कारखान्याने जतचे युनिट 47 कोटी 86 लाखाला खरेदी केले होते. त्यानंतर पुन्हा जतेच्या विकासाचा मानबिंदू असणाऱया या कारखान्याचे धुराडे पेटले होते. मागची चार वर्षे हा कारखाना राजारामबापूने ताकदीने चालवला होता.
एकीकडे राजारामबापू कारखान्याने जतचे धुराडे सुरू केले असले तरी या कारखान्याच्या बाबतीत येथील सभासद कुंडलिक दुधाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारखाना विक्रीला आव्हान दिले होते. यापैकी दोन निकाल सभासदांच्या बाजूने लागलेले आहेत. तर अंतिम निकाल मार्च 2017 मध्ये होण्याची शक्यता असून जतचा कारखाना निश्चितपणाने सभासदांच्या मालकीचा होण्याचे संकेत आहेत. तसेच जिल्हय़ातील निनाईदेवी व यशवंत हे दोन्ही कारखाने पुन्हा सभासदांच्या ताब्यात आल्याने जतचा कारखानाही सभासदांना मिळणार याबाबत खात्री निर्माण झाली आहे.
दरम्यान, सभासदांच्या बाजूंनी कुंडलिक दुधाळ यांनी दाखल केलेल्या याचिकेत जत कारखान्याचे सभासदांची संख्या 22 हजार 285 असून, कारखान्याची 202 एकर बिगर शेती जमीन आहे. जरी कारखाना आर्थिक कोंडीमुळे आणि कारखान्यावरच्या कर्जामुळे बंद राहीला असला तरी जत कारखान्याची मालमत्ता ही कर्जापेक्षा जादा आहे. तसेच राज्य बँकेकडून हा कारखाना विक्री होताना, राजारामबापू या एकाच कारखान्याची निविदा आली होती. शिवाय त्यांनी हा कारखाना अल्प किंमतीत खरेदी केला. यात सभासदांचे मोठे नुकसान झाले असून, हा कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा व्हावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. यावरचा अंतिम निकाल मार्च 2017 मध्ये होण्याचे संकेत आहेत.

जत कारखान्याचा हा जांगडगुत्ता सुरू असतानाच यंदा राजारामबापू कारखान्याने ऊसटंचाई व झोनबंदीच्या नावाखाली बारा दिवसात गाळप बंद केले. कारखाना बंद होताच, त्यांनी मशिनरी खोलण्यास सुरूवात केली आहे. येथील स्टॉक साखरही तातडीने हालवण्यात येत आहे. बगॅसची विक्री करण्यात येत असून यामुळे कारखान्यात पुन्हा नवे काय घडणार याबाबत सभासदांमध्ये व कारखाना बचाव समितीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याचबरोबर येथील स्थानिक कामगारांना तोंडी आदेश देऊन कामावरून कमी करण्यात आले आहे. तर कायम असणारे कर्मचारी दुसऱया युनिटकडे हालवले जात आहे. जत कारखान्यावर होणाऱया घडामोडीबाबतही गोपनीयताही पाळण्यात येत आहे.
यंदा जतच्या कार्यक्षेत्रात असणाऱया उस उत्पादक शेतकऱयांनी जत कारखान्यास ऊस देण्यास नकार दिला. कारण गतवर्षी राजारामबापूने जो दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे त्यांना बिले अदा झाली नाहीत.त्यामुळे ऊस शेतकरी नाराज आहेत.

ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे सावट

ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे सावट
जत,(प्रतिनिधी)-
मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे फळबागा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रोगट हवामानामुळे द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसणार असल्याने द्राक्ष पट्ट्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक अपत्तींमुळे शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडले आहे. शेतमालाच्या बाजारभावाचीही नेहमी ओरड असते. त्यात नोटबंदीमुळे तेजीत असणाऱ्या भाजीपाला, फळांचे दरही मोठ्याप्रमाणात घसरले आहेत. शेतकऱ्यांची ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’अशी अवस्था झाली आहे. त्यात आता खराब हवामानाचे संकट ओढवल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
खराब हवामानामुळे फळपिके, भाजीपाल्यावर रोग पडत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ होत आहे. तसेच, वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाची हमी मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेती बेभरवशी धंदा असल्याची प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून उमटत आहे.
सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याचा काळ सुरू आहे, तर काही ठिकाणी द्राक्षबागांचे तोडे सुरू आहेत. पाणी उतरण्याच्या काळात पाऊस व हवामान ढगाळ झाल्यास द्राक्षमणी फुटण्याचा धोका असतो. अशीच स्थिती पुढील दोन दिवस राहिल्यास द्राक्ष बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊ शकते. मंगळवार  रात्रीपासून  तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे, तर बुधवारी सकाळपासून परिसरात काही भागात हलका पाऊसदेखील झाला. आजही दिवसभर ढगाळ वातावरण राहिले आहे. असेच आणखी दिवस राहिले तर खराब हवामानामुळे द्राक्षबागांवर डाऊनी, भुरी, रसशोषक कीड आदींचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. तसेच, भाजीपाला पिकांवरदेखील रसशोषक किडींचा हल्ला होण्याचा धोका आहे.

Tuesday, December 6, 2016

आता जानकरही टिपले जाणार का?


जत,(मच्छिंद्र ऐनापुरे)-
राजकारणी माणसाला नेहमी सावध राहावं लागतंकारण राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतातअस्तित्वाच्या या लढयात कधी शिकारी वरचढ होतो तर कधी त्याचीच शिकार होऊन जातेस्वातंत्र्यानंतरच्या काळात पूर्वीचे मंत्री राजकारण करीत नव्हते असे म्हणण्यापेक्षा आपल्याकडून कायदे मोडणार नाहीतसंसदीय प्रथा परंपरांचे नीट पालन होईलत्यावर भर देत होते.  मात्रपुढे 1980 प्रघात झाला आणि मंत्र्यांची प्रतिमा डागाळण्याचे सत्र सुरू झालेभ्रष्टाचार अन् आरोपांच्या फैरीत आजवर तीन मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे तर अनेक मंत्र्यांना राजिनामा देऊन पदावर पाणी सोडावे लागले होते
सध्या राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर निवडणूक अधिकार्याला धमकविल्याचे आरोप होताहेतत्यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहेजानकरांच्या कृत्यावरून त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावाअशी मागणी जोर पकडू लागली आहेपरंतुअशा मागण्या काही आता नवीन राहिलेल्या नाहीतइतिहासावर लक्ष घातल्याससर्वप्रथम 12 जानेवारी 1982 ला प्रतिभा प्रतिष्ठान आणि सिमेंट घोटाळ्याच्या आरोपामुळे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए . आरअंतुले यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलामुलीच्या एमडी अभ्यासक्रमात गुणवाढ दिल्याप्रकरणी मार्च 1986 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनाही राजीनाम्याला सामोरे जावे लागले होते.  जून 1988 मध्ये जेजेरुग्णालयातील औषध घोटाळा प्रकरणी तत्कालीन आरोग्यमंत्री भाई सावंत यांनाही ’लेन्टीन’ आयोगाच्या अहवालानंतर राजीनामा द्यावा लागलागोवारी हत्याकांडानंतर 30 नोव्हेंबर 1994 ला आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनाही तोच कित्ता गिरवावा लागला होतागैरव्यवहाराच्या आरोप झाल्यामुळे 24 एप्रिल 1997 ला तत्कालीन कृषिमंत्री शशिकांत सुतार यांनाही पदावरून दूर जावे लागलेपाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर यांनाही 5 डिसेंबर 1996 मध्ये राजीनामा द्यावा लागला.
गृहमंत्री पदावर असताना नवाब मलिक यांना लोकायुक्तांच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्यामुळे 15 मार्च 2005 ला राजीनाम्याला पुढे जावे लागलेअण्णा हजारे यांनी एका घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर सुरेश जैन यांनाही मागे फिरावे लागलेवनविभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वनमंत्री सुरूपसिंग नाईक यांचेही 12 मे 2006 मध्ये तेच झालेबहुचर्चित आदर्श घोटाळा प्रक रणी 2010 मध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागलेभ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तर राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ सध्या तुरुंगात आहेगैरव्यवहाराच्या आरोपाखाली एकनाथ खडसेनाही महसूल खाते सोडावे लागलेएकूणच, 1980 पासून भ्रष्टाचारगैरव्यवहाराचे आरोप आदीप्रकरणांमुळे पद गळतीची सुरुवात झालीआता राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर महादेव जानकर याच आरोपांच्या कात्रीत अडकले आहेतत्यामुळे आताजानकरही टिपले जाणार कायाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारी कर्मचार्‍यांची माहिती आता एका क्लिकवर


जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून राज्यभरातील शासकीय कर्मचार्यांचा माहितीकोश तयार करण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेयासाठी कर्मचार्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन मागवण्यात आली आहे.
सध्या या माहितीच्याबाबतीत शिक्षण खाते आघाडीवर असले तरी आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती एकत्रितरित्या उपलब्ध आहेशिक्षण विभागाची माहिती सरल प्रणालीसाठी भरण्यात आली आहेमात्र आता आणखी ही माहिती सर्वंकष माहितीकोशासाठीही भरावी लागणार आहे.राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय कार्यालयाकडून शासनाच्या सेवेत असणारे सर्व कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषदेकडील कर्मचारांचा सर्वंकष माहितीकोश तयार केल्यानंतर तो दरवर्षी अद्ययावत केला जाणार आहेयामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी,रोजंदारीअंशकालीन व मानसेवी तसेच तदर्थ तत्त्वावर नेमणुका करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या कर्मचार्यांच्या माहितीचा समावेश असणार आहेहा सर्वंकष माहितीकोष (एम्प्लॉइज मास्टर्स डाटाबेसअद्ययावत करण्यात येत आहेत्या अनुषंगाने 1 ऑक्टोबर 2016 या तारखेचा आधार मानून कर्मचार्यांचा सेवार्थ आयडीभविष्यनिर्वाह निधी,डीसीपीएस खाते क्रमांक,पॅनकार्ड क्रमांक,कर्मचार्यांचे नावजन्मदिनांक,सेवेत रुजू झाल्याची तारीख तसेच सेवानिवृत्तीची तारीख व इतर सर्व माहिती संकलित करण्यात आली आहेशिवाय ती ऑनलाइन भरण्यात स्थानिक स्तरावरून भरण्यातही आली आहेशिवाय आश्वासित प्रगती योजना (पहिली 12 वर्षांनंतर व दुसरी 24 वर्षांनंतर), विभागीय परीक्षा इत्यादी माहितीही गोळा केली जात आहे.
आता ही माहिती सादर झाल्यानंतर संबंधित खात्याच्या अधिकार्याने 16 डिसेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 पर्यंत पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.मे2017 पर्यंत संबंधित अधिकार्याने माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहेएम्पॉइज मास्टर्स डाटाबेस सेवार्थ प्रणालीमध्ये त्याच्या कार्यालयाने भरलेली माहितीआधारभूत माहिती म्हणून मानली जाणार आहेयात बदली हो ऊन आलेले व नवीन नेमणूक झालेले कर्मचारी यांचीही माहिती घेतली जाणार आहेया माहितीशिवाय जानेवारी 2017 ची देयके कोषागार कार्यालयात स्वीकारली जाणार नाहीतअसेही सांगण्यात आले आहे.

कोळगिरी येथील काळभैरव मंदिर परिसरात ‘ढका’ या मराठी चित्रपटाचे शुटींग


जत,(मच्छिंद्र ऐनापुरे)-
जत तालुक्यातील कोळगिरी येथील प्रसिद्ध काळभैरवनाथ मंदिर परिसरात ढका’ या मराठी चित्रपटाचे शुटींग सुरू असून अॅक्शन,प्रेम,ड्रामा आणि कॉमेडी असा भरपूर मसाला असलेल्या चित्रपटाची निर्मिती घेरडी (जि.सोलापूरयेथील माँसाहेब फिल्मस प्रॉडक्शन हाऊस करीत आहे.फेब्रुवारी 2017 मध्ये सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल होत असून या फेस्टिवलमध्ये चित्रपट लावण्याच्यादृष्टीने चित्रपटाचे चित्रिकरण वेगाने आटपले जात आहे.
पारधी समाजातील पारंपारिक रुढींवर आधारित हा चित्रपट असून यात प्रेमकथा आहेच शिवाय ड्रामा,ॅक्शन आणि कॉमेडी असा भरपूर मसाला या चित्रपटात आहेमार्शल कोळेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून त्यांनी बॉलीवूडचे काही चित्रपट केले आहेतअसिस्टंट डायरेक्टर म्हणून सांगोल्याचे मोहसीन पठाण काम पाहत आहेत.गीत-संगीताची जबाबदारी सुभाष जगधने पेलत आहेतया चित्रपटात सांगोलामंगळवेढापंढरपूर आणि सोलापूर परिसरातील कलाकार काम करत असून कॅमेरामन म्हणून फैयाज मणियार आणि सोहेल नाईक(विजापूरकाम पाहात आहेत.
चित्रपटाचे शुटींग जत तालुक्यातील कोळगिरीसह सांगोला तालुक्यातील घेरडी,कोळे,शिरसी या परिसरात होत आहे.या चित्रपटाच्या निर्मितीची बाजू विजय जगधने,फारुखभाई आत्तारशेहबाज पटेल,शब्बीर पठाण सांभाळत आहेतया चित्रपटातील नायक-नायिकेची भूमिका संग्राम काटे (कोळे),कोमल सर्वगोड (पंढरपूर)हे नवोदित कलाकार साकारत आहेतखलनायकाच्या भूमिकेत विजय गायकवाड (सांगोलादिसणार आहेत.
या चित्रपटाचे एक निर्माते विजय जगधने म्हणाले की,आपल्या भागातील कलाकार घेऊन चित्रपट करण्याचा आमचा खूप दिवसांपासूनचा मानस होताआमचा पूर्वी सुनील नावाचा ऑर्केस्ट्रा होतात्यामुळे अभिनय,दिग्दर्शन या बाजू आम्हाला परिचयाच्या आहेतत्यामुळे आम्ही या क्षेत्रात नवखे असलो तरी त्याची काही अडचण आम्हाला आली नाहीकोळगिरी येथील काळभैरवनाथ मंदिराचे ठिकाण निसर्गरम्य आहेउद्यान उभारले गेले आहेपाण्याचे ठिकाण आहेचित्रपटाच्या चित्रिकरणासाठी लागणारे वातावरण इथे आहेत्यामुळे जास्तीतजास्त शुटींग या परिसरात करण्याचा आमचा मानस आहेया मंदिराचे विश्वस्त आणि प्राथमिक शिक्षक सिद्धगोंडा पाटील आणि देवस्थान कमिटी यांनी आम्हाला बहुमोल सहकार्य केले आहेहा चित्रपट लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस असून सोलापूरला फेब्रुवारी 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल होत असून या फेस्टिवलमध्ये हा चित्रपट लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे श्रीजगधने यांनी सांगितले.या चित्रपटासाठी सुरेश जगधने,रमेश घुटुकडेदत्ता जावीरमोहसीन पठाण आदी प्रयत्न करीत आहेत.

Saturday, December 3, 2016

जातीव्यवस्था असेपर्यंत आरक्षण राहणारच : डॉ. भालचंद्र मुणगेकर


जत,(प्रतिनिधी)-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून लिहिलेल्या राज्यघटनेत बदल करणे शक्य नाही असे सांगून जोवर या देशात जातीयव्यवस्था अस्तीत्वात राहील तोवर आरक्षणात कसलाही बदल करता येणार नाही. त्याचबरोबर दलितांसाठी कवचकुंडले असणारा ऍस्ट्रॉसीटी कायदय़ाला कुणीही हात लावू शकणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा समता अभियानाचे संस्थापक, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी  जत येथे बोलताना केले.
जत तालुका समता अभियान संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या अधिवेशनात मार्गदर्शन करताना डॉ. मुणगेकर बोलत होते. येथील राजमाता अहिल्यादेवी सभागृहात पार पडलेल्या या अधिवेशनाला जत तालुक्यातील सर्वच समाजातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विलासराव जगताप होते.
डॉ. मुणगेकर या अधिवेशनाला मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, स्वातंत्र्य मिळून या देशाला सत्तर वर्षे ओलांडली तरीही गावकुसाबाहेर राहणाऱया झोपडयातील माणसांचं जीवन अजूनही समृध्द झालं नाही. भटक्या विमुक्त जमातीतील माझ्या माता भगिणींना आजही अंगावर घालायला वस्त्र नाही ही शोकांतिका आहे. म्हणूनच आपण समता अभियानाच्या माध्यमातून एक कृतीबध्द कार्यक्रम हाती घेवून समतेचा विचार रूझवण्याचे काम हाती घेतले आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली, विचार दिला. त्याचपध्दतीने फुले, शाहू, राजा शिवराय यांचे विचारांची खऱया अर्थांनी अमंलबजावणी करण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकरांचा विचार एका शब्दात शब्दबध्द करायचा म्हंटल्यास समता हे एकच वाक्य पुरेसे आहे.
म्हणूनच आम्ही 20 जुलै 2016 रोजी समता अभियानाची स्थापना केली. या अभियानाची सुरूवात झाल्यानंतर जळगाव, मिरज येथे अधिवेशन झाले. त्यानंतर आज जतेत होत आहे. याच महीन्यात 24 डिसेंबरला आम्ही मुंबईत संविधान सन्मान मोर्चाचे आयोजन केले आहे. समता अभियान ही संस्था कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. या संस्थेने पंधरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. यात प्रामुख्याने जातीच्या दाखल्यासाठी असणारी 50 वर्षांची अट रदद करावी, खासगीकरण शिक्षणात सर्वांनाच सवलतीच्या दरात शिक्षण मिळावे, जात पडताळणी कायदा रदद करावा, दलित, आदीवासी, भटके, मुस्लीम यांच्यासाठी लोकसंख्येनुसार देण्यात येणारा निधी आजही राज्य व केंद्र सरकारकडून खर्ची केला जात नाही, तो करण्यात यावा, परवाना नसलेली सावकारी बंद करण्यात यावी, नोकरभरती अनुशेष भरून काढण्यात यावा, आर्थिक निकषानुसार आरक्षण देताना केवळ एकाच समाजाचा विचार करू नये आदी प्रश्नांसाठी यापुढे आमची लढाई असणार आहे.
ऍस्ट्रोसिटी बाबतीत कसल्याही दुरूस्तीला आमचा विरोध राहील कारण या देशात आजही सव्वा लाख पेसेल न्यायालयात निकालाविना प्रलंबीत आहेत. त्यामुळे दलितांसाठी ते कवच कुंडले आहेत, तिला धक्का लावू देणार नाही असेही डॉ. मुणगेकर यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकडॉ. नामदेव कस्तुरे, संजय कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन भूपेंद्र कांबळे यांनी तर आभार शंकर वाघमारे यांनी मानले. 

वृक्ष तोडणार्‍यावर होणार फौजदारी कारवाई


 घराच्या आवारातील झाडेही घरमालकाला विनापरवाना तोडता येणार नाहीत
जत,(प्रतिनिधी)-
वृक्ष लागवड योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर आणि आता वृक्ष लागवड चळवळ बनलेली असताना शासनाने अवैध वृक्षतोडीला अतिशय गांभीर्याने घेतले आहे. यापुढे वृक्षतोड आढळल्यास तोडणार्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे घराच्या आवारातील झाडेही घरमालकाला विनापरवाना तोडता येणार नाही.
      शेतजमिनीच्या बांधावरील मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जाते. रस्त्याच्या बाजूला मोठ्या वृक्षांच्या बुंध्यामध्ये विस्तव टाकून हे वृक्ष जाळण्याचे प्रकार वाढले आहे. एका वृक्षाची परवानगी काढून दहा ते बारा झाडे तोडून अवैधरित्या लाकूड तस्करीत वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित वनाधिकारी तसेच प्रशासनातील अधिकारी मालामाल होत आहेत.
विशेषत: शहराच्या ठिकाणी ले-आऊट तयार करताना झाडांची कत्तल करून जमीन आकर्षक करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे परवानगीकरिता अर्ज करण्यात येत असतो.तसेच घर बांधताना नगरपरिषद व ग्रामीण भागात घराचे बांधकाम करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अनिवार्य आहे. आता ही परवानगी देण्यापूर्वी घेण्यापूर्वी प्लाट ले - आऊट धारकांना किंवा घराचे बांधकाम करणार्यांना, प्लॉट धारकांना वृक्ष लागवड करावी लागणार आहे. संबंधित जागेवर कितपत लागवड झाली या बाबीबी खात्री संबंधित अधिकार्यांना करावी लागणार आहे.
वृक्ष लागवड झाल्यानंतर रितसर परवानगी देण्यात येणार आहे. वृक्ष लागवड न केल्यास आणि बांधकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य शासनाने सर्व जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे. मात्र एवढे हे सर्व होऊनही अवैध वृक्षतोड झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित नक्कीच होईल.
वृक्षतोडीने पर्यावरणाचा र्हास

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवितीहे संत तुकोबारायांच्या ओळीघरोघरी लावा वृक्ष, मिळेल तुम्हा मोक्षया सत्यवचनाची साक्ष देते. परंतु आज मानवाने व्यापारी व घरगुती कारणासाठी जंगलातील व शेतातील वृक्षतोड करून पर्यावरणाचा सत्यानाश केला आहे. या गंभीर जंगलतोडीनेच पाऊस सुद्धा रुसून बसल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. श्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी काव्यातून लिहिलेलेकसा झाला हा माणूस कडू लिंबाचा रे पाला, येल काकडीचा होता, बार कारल्याचा आलाहे काव्य आजच्या निर्दयी वृक्षतोडी माणसाला तंतोतंत शोभेल असेच आहे. अशी ही वृक्षे तोडताना आता लोकांना दहादा विचार करावा लागणार असला तरी यातल्या अवैध मार्गाबाबत प्रश्न अनुत्तरीत आहे.

आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे


जत,(प्रतिनिधी)-
बाजारात येणार्या नामांकित कंपन्यांची आधुनिक शेती अवजारे घेण्याकडे कल वाढल्यानेऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू देअसे म्हणत घणाच्या घावाने अवजारांना आकार देणार्या, श्रमामधूनच रोजीरोटी मिळविणार्या घिसाडी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. ‘आभाळागत माया तुझी आम्हावर राहू देही देवाकडे भाकली जाणारी करुणादेखील कामी येत नसल्याची स्थिती आहे.
घिसाडी हा भटके विमुक्तांमधील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागे राहिलेला समाज आहे. आधीच्या पिढ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले नाही; त्यामुळे त्यांची प्रगती खुंटल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे. खोरे, टिकाव, खुरपे, कुर्हाड, विळे, म्हशीच्या भोरकड्या, कोयते, दाताळे आदी शेती व जनावरांसाठी लागणारे साहित्य बनवून देणे हा या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. यातून जे मिळेल त्यावरच कुटुंबांची गुजराण करीत हा समाज जगतो आहे.

दहा-वीस वर्षांपूर्वी पक्की घरे बांधणेदेखील दुरापास्त होते. पालं ही त्यांची घरं, अशी स्थिती होती. कसण्यासाठी अपवादानेच जमिनी होत्या. काळाच्या ओघात शेतीचे तंत्र बदलत चालले. वेळ, मनुष्यबळ व पर्यायाने पैशांचीही बचत होणार असल्यामुळे ती अवजारे घेण्याचा शेतकर्यांचा कल वाढू लागला. पण, एखाद्याच्या प्रगतीच्या पावलांखाली दुसर्याच्या अधोगतीची सावली असते. या नियमानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा फटका या समाजाच्या कारागिरीला बसला आहे. जत शहरातील या समाजाची व्यथादेखील मोठी आहे. विठ्ठलनगर रोडला या समाजाने पाले टाकून आपला व्यवसाय सुरू केला असला तरी बाजारात मिळणार्या कंपन्यांच्या तयार अवजारांमुळे त्यांच्या साधनांना मागणी कमी असल्याचे दिसून येत असून त्यामुळे हा व्यवसाय करणार्या या समाजातील लोकांना आर्थिक तंगीला सामोरे जावे लागत आहे.

कर्णकर्कश हॉर्नमुळे वाहनचालक त्रस्तजत,(प्रतिनिधी)-
परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेचा विचार न करता अधिक क्षमतेचे कर्णकर्कश हॉर्न बसवून अनेक वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवीत आहेत. शाळा, महाविद्यालय व दवाखाने, तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर यामुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त आहेत.
वाहन कायद्यात कोणत्या वाहनास किती डेसिबल क्षमतेचे हॉर्न वापरावेत याचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. दुचाकी व चारचाकी मोटारी व मालवाहतूक वाहनउत्पादक करणार्या विविध कंपन्यांनी गाडीला बसविलेले हॉर्न परिवहन विभागाच्या नियमानुसार योग्य क्षमतेचे बसविलेले असतात. त्यांचा आवाजपिप पिपअशा स्वरूपाचा असतो. मात्र, रस्त्यावर काही तरी वेगळेपण दाखविण्याची सवय जडलेल्या काही वाहनधारकांना हे हॉर्न लक्षवेधी वाटत नाहीत. पादचारी, अन्य वाहनधारकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी त्यांना सायरन किंवा म्युझिकल हॉर्न लावावेसे वाटतात.
तरुणाईलाही कर्णकर्कश हॉर्नचे विशेष आकर्षण दिसत आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे हॉर्न मिळत आहेत. या हॉर्नची वॉरंटी वा गॅरंटी नसली, तरी तरुणाईचा खरेदीकडे कल आहे.
कायद्यात तरतुदी असतानाही विशेष जागृती होत नसल्याने, तसेच दंडात्मक कारवाईचे प्रमाण कमी असल्याने कर्णकर्कश हॉर्न बसविण्याकडे कल वाढला आहे. दुचाकी, मोटारी, हलकी वाहने, मालवाहू वाहने यांच्याकरिता हॉर्नबाबत नियम आहेत. मात्र, नियम डावलून दुचाकी, मोटारधारक मोठ्या व कर्णकर्कश हॉर्न बसवीत आहेत. परिसरात वाहनांची संख्या वाढत असून, चारचाकी वाहनांचीही गर्दी झाली आहे. मध्यमवर्गीय प्रत्येक कुटुंबाकडे किमान दुचाकी आहेच. सुखवस्तू कुटुंबाकडे प्रत्येकाला एक वाहन अशी स्थिती बनली आहे. काही महाभागांनी दुचाकीलासुद्धा कानठळ्या बसविणार्या आवाजाचे हॉर्न बसविले आहेत, तर काहींनी लहान मुलांच्या रडण्याचे, कुत्र्याच्या भुंकण्याचे किंवा सायरनसारखे आवाज काढणारे हॉर्न बसविले आहेत.

शाळा, महाविद्यालये, दवाखाने आदी ठिकाणी हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. मात्र, याची माहिती वाहनचालकांना नसावी, अशी स्थिती आहे. या सर्व ठिकाणांपासून कर्कश हॉर्न वाजवीत भरधाव जाणार्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिक करीत आहेत. कर्णकर्कश हॉर्न या विषयाबाबत जागृती करण्यासाठी सामाजिक व स्वयंसेवी संघटनांसह, परिवहन खात्याने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे

स्वयंपाकी व मदतनिसांचे मानधन रखडले!


जत,(प्रतिनिधी)-
अंगणवाडी व शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवून देणार्या स्वयंपाकी, मदतनीस, बचत गटांचे मानधन, इंधन खर्च गत सात महिन्यांपासून मिळाला नाही. तालुक्यातील स्वयंपाकी व मदतनिसांना या मानधनाची प्रतीक्षा असून उधारी-उसनवारी आता संपुष्टात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहार शिजवून देण्याची जबाबदारी स्वयंपाकी, मदतनीस, कामगार व बचत गटाच्या महिलांनी स्वीकारली आहे. या मोबदल्यात शासनाकडून मानधन व भाजीपाला, बिस्किट, इंधन खर्च दिला जातो. गत काही सात महिन्यांपासून स्वयंपाकी व मदतनीस यांना मानधन व अन्य खर्च मिळालेला नाही. त्यामुळे या मानधनाअभावी विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. आतापर्यंत ऊसनवारीवर इंधन खर्चाचा भार पेलला आहे. यापुढे ऊसनवारीचे व्यवहारही संपुष्टात येत असल्याने पोषण आहार शिजवावा कसा? असा प्रश्न स्वयंपाकी व मदतनिस संघटनेने उपस्थित केला आहे.

तालुका स्तरावर होणार दारूबंदी समिती!


जत,(प्रतिनिधी)-
जिल्ह्यासह राज्यात मोठया प्रमाणात अवैध दारूची विक्री होते. यामध्ये देशी-विदेशी दारूसह गावठी दारूची सर्रास विक्री होते. राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस विभागही अवैध दारू अड्डयांवर धाडी घालून अड्डे उद्ध्वस्त करतात; परंतु काही दिवसांमध्येच पुन्हा अवैध दारूचे अड्डे उभे राहतात. त्यामुळे अवैध दारूचे निर्मूलन करण्यासाठी आता तालुका स्तरावर दारूबंदी समिती आणि गाव स्तरावर ग्राम रक्षक दल स्थापन करण्यात येणार आहे.

अवैध दारूचे सर्वाधिक अड्डे हे ग्रामीण भागातच असून त्याची अवैध दारू विक्री शहर व ग्रामीण भागात करण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. हातभट्टीच्या दारूचे अड्डेही ग्रामीण भागात दिसून येतात. हातभट्टीच्या दारूमध्ये विविध प्रकारच्या विषारी घटकाचे मिश्रण करून त्याची विक्री होत असल्याने जीवितहानी झाल्याच्या घटना सातत्याने घडतात. दारू विक्रीच्या व्यवसायामध्ये कमी श्रमात अधिक पैसा कमाविण्याची ओढ लागली असते. हातभट्टीसाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड करतात. त्यामुळे अवैधरीत्या तयार होणार्या दारू निर्मितीला व विक्रीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून तालुका स्तर आणि गाव स्तरावर दारूबंदी समित्या बनविण्यात येणार आहेत. या समितीच्या माध्यमातून तालुका व परिसरात अवैध दारूच्या विक्रीला आळा घालून पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यात येईल. गावामध्ये कुणी गावठी दारू प्राशन करणार नाही. यासाठी गाव दारूबंदी समिती प्रयत्न करेल. तालुका व गाव स्तरावर दारूबंदी समित्या नियुक्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने राज्यातल्या तालुक्यांच्या तहसीलदारांना आणि पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. दारूबंदी समितीमध्ये प्रतिष्ठित नागरिकांसह ग्रामपंचायतचे पदाधिकारी, पोलीस पाटील राहतील. तालुकास्तरीय समितीमध्ये ठाणेदारांसह नागरिकांचा समावेश असणार आहे.

कोळगिरी तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्याची भाविकांची मागणी
जत/प्रतिनिधी
जत तालुक्यातील कोळगिरी येथील श्री काळभैरवनाथ हे ठिकाण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून याठिकाणी लाखो भाविक दर्शनाला येत असतात.इथे प्राचीन खुणा असून मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे.पर्यटनाच्यादृष्टीने या क्षेत्राचा विकास होण्याची गरज असून तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्यात यावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
जत तालुका दुष्काळी तालुका असून या परिसरात निसर्गरम्य, हिरवी गर्द झाडी असलेला परिसर क्वचितच ठिकाणी पाहायला मिळतो, मात्र कोळगिरी येथील काळभैरवनाथ तीर्थक्षेत्र परिसर हिरवाईने नटला आहे. हा परिसर दरीत वसला असून चोहो बाजूंनी डोंगर आहेत. पावसाळ्यात तर याठिकाणी दोन-तीन ठिकाणी धबधबे वाहताना आढळून येतात. बाजूलाच तलाव असून याठिकाणी वर्षभर पाणी असते. पिण्यासाठीही इथे मुबलक पाणी उपलब्ध आहे. या क्षेत्राला सध्या ‘क’ दर्जा प्राप्त आहे, मात्र हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणूनही विकास पावण्याची गरज असून त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
काळभैरवनाथ देवस्थान हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी बर्‍याच प्राचीन खाणाखुणा, वीरगळ, शिलालेख उपलब्ध आहेत. इथे मोठ्या प्रमाणात वीरगळ आढळून येतात. मध्ययुगीन काळात छोटीमोठी युद्धे, आक्रमणे झाली. त्यात ज्ञात-अज्ञात शूर योद्धे, सरदार, सैनिक हे देश आणि धर्मासाठी धारातीर्थी पडले. त्याच वेळी तत्कालीन स्त्रिया, त्या काळच्या रुढीप्रमाणे पतिप्रेम व अब्रुरक्षण यांसाठी त्यांचा देह अग्नीच्या स्वाधीन करून सती गेल्या. त्या सती गेलेल्या स्त्रियांची चित्रे, त्यांच्या शौर्यगाथा दगडी शिलांवर कोरल्या गेल्या. त्यांनी लोककल्याणार्थ केलेले कार्य समाजाच्या नजरेसमोर कायमस्वरूपी राहवे यासाठी ती शिल्पे उभारली गेली. याचा अधिक अभ्यास होण्यासठी गरज आहे. मंदिराच्या गाभार्‍यात आकर्षक शिवलिंग आहे. मंदिराचे खांब विविध नक्षींनी कोरलेले आहेत. या देवस्थानला लांबून भक्त येत असतात. असे असले तरी शासकीय, राजकीय पातळीवर या तीर्थक्षेत्राची म्हणावी अशी दखल घेण्यात आली नाही. हे ठिकाण उपेक्षित राहिल्याने प्राचीन काळातील असूनही याचा विकास झालेला नाही. या ठिकाणाचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असून तीर्थक्षेत्राला ब दर्जा देण्यात यावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान कमिटीने या परिसरात मोठा बगिचा फुलवला असून ऑक्टोबर महिन्यात या बगिच्याचे सिद्धेश्‍वर महाराज (विजापूर) यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. या परिसरात पूर्व बाजूला सिमेंट बंधारा झाला असून तसाच रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला म्हणजे पश्‍चिमेस आणखी एक बंधारा बांधण्यात यावा, तसेच ओढा पात्राचे विस्तारीकरण करण्यात यावे आणि परिसरात आणखी झाडे लावण्यात यावीत, अशी मागणी भाविकांमधून होत आहे. 12 लाख खर्चून पाझर तलाव दुरुस्त करण्यात आला आहे, मात्र तरीही गळती होत असून त्यामुळे पाणी साठपा म्हणावासा होत नाही. याठिकाणी बोटींग व्यवस्था करण्यासारखी परिस्थिती असून याचा लाभ तीर्थक्षेत्राला होणार असून पर्यटनास वाव मिळणार आहे.
देवस्थान कमिटीतील विश्‍वस्त व प्राथमिक शिक्षक सिद्धगोंडा पाटील म्हणाले की, हा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. चोहोबाजूंनी डोंगर, झाडी आहे. शांत असा हा परिसर असून अध्यात्म्याच्यादृष्टीने आणखी यात भर घालण्याची आवश्यकता आहे.इथे शाळांच्या सहली येत आहेत. विवाह सोहळे होत आहेत. याठिकाणी वर्षभर मोफत महाप्रसाद सुरू आहे. याठिकाणी अडीच एकरात लॉन करण्याचा मानस आहे. तलावात बोटींग करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी निधीची कमतरता भासत असून शासनाने या तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा द्यावा, याचा लाभ भाविकांना आणि पर्यटकांना होणार आहे.

उटगीतील कन्नड शाळेसमोरील झुडपे हटवण्याची मागणी

(उटगी येथील जि.प.कन्नड शाळेसमोर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली असून या ठिकाणी लोक शौचास बसत आहेत. त्यामुळे डुक्करांचा प्रादूर्भावही वाढला आहे.)  छाया - मच्छिंद्र ऐनापुरे,जत

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उटगी गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेसमोर भयानक स्वरूपात वाढलेल्या घाण बाभळीची झुडपे हटविण्याची मागणी शिक्षक आणि पालकांकडून होत आहे. या झुडपात नागरिक शौचास बसत असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली असून डुकरांचा हौदोस वाढला आहे.त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.
जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या समोर मोठ्या प्रमाणात ही झुडपे वाढली आहेत.ही झुडपे काढली नसल्याने ती मोठ्या वृक्षासारखी वाढली आहेत.गावातले लोक या झुडपाचा शौचासाठी वापर करीत असून गावातील जवळपास पन्नास टक्के लोक या जागेचा शौचासाठी म्हणून  उपयोग करत आहेत. हागणदारीमुक्त  होण्यासाठी गाव प्रयत्न करत असताना प्रथम दर्शनी दिसणारी ही झुडपे गावाची कळा दाखवत आहेत. ही झुडपे स्वच्छता अभियानास अडथळा ठरत आहेत. गाव हागणदारीमुक्त होण्याला अजून तीस टक्के लोकांनी शौचालये बांधलेली नाहीत. शिवाय गावाबाहेर आणि शाळेला जाणारे रस्ते शौचाने भरलेली आहेत.विद्यार्थ्यांना नाक दाबून शाळेत जावे लागत आहे.
शाळा परिसरात लोक शौचास बसत असल्याने डुकरांची संख्याही वाढली आहे.याचा त्रास दुपारच्या विद्यार्थ्यांच्या जेवणावेळी होत आहे.सगळी डुकरे शाळेच्या आवारात गोळा होत असतात.ही डुकरे मुलांना जेऊ  देत नाहीत. ग्रामपंचायतीला याबाबत तक्रार देऊनही याकडे लक्ष दिले जात नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतीने शाळा परिसरातील झुडपे तोडावीत आणि विद्यार्थ्यांना दुर्गंधीपासून मुक्त करावे,अशी मागणी पालक आणि शिक्षकांमधून होत आहे.

Thursday, December 1, 2016

जत येथे के.एम.हायस्कूलच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त मोठी रॅली

जत,(प्रतिनिधी)-
जत येथील के.एम.हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त जत शहरातून मोठी रॅली काढण्यात आली. हा दिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. यात शिक्षक,विद्यार्थी आणि पालक यांनी सहभाग घेतला.
शाळेच्या पटांगणात उपस्थित शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांना एड्सला प्रतिबंधासाठी  यावेळी  प्रतिज्ञा देण्यात आली. ‘होऊया सारे एकसंघ करुया एच आय व्ही चा प्रतिबंध’  हे या वर्षी एड्स दिनाचे घोष वाक्य असून एड्सवर उपचार ऐवजी त्यापासून सावधानता बाळगणे हाच पहिला उपाय असल्याचे यावेळी मार्गदर्शकांनी  सांगितले.एड्सपासून सतर्कता हाच उपाय असून एड्सवर नियंत्रणासाठी नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवश्यकता असून त्यामुळे शाळांशाळांमध्येही विविध उपक्रम राबवले जात असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक रियाज सय्यद यांनी सांगितले. यावेळी क्रीडाशिक्षक विजय बिराजदार यांनी व अन्य शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमानंतर शहराच्या विविध भागातून मोठी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शहरातील आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी,विविध शाळांचे विद्यार्थी,शिक्षक आणि पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.