Friday, December 23, 2016

संजना व्होनमोरे हिची राष्ट्रीय रिंगबॉल संघात निवड


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बेळोंडगी येथील एम.जी.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु.संजना मल्लिकार्जून व्होनमोरे हिची राष्ट्रीय रिंगबॉल संघात निवड झाली आहे. तिने सहभाग घेतलेल्या महाराष्ट्र संघाने बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे. जतसारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागात राहून तिने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कु.संजना ही इयत्ता 9 वीत शिकत असून तिच्या उत्तम कामगिरीमुळे तिने अल्पावधीतच महाराष्ट्र राज्याच्या रिंगबॉल संघात स्थान पटकावले. कबड्डी,धावण्याच्या व गोळाफेक स्पर्धांमध्ये तिची कामगिरी उल्लेखनिय आहे. तिच्या कामगिरीमुळे आणि  के.एम.हायस्कूल येथील क्रीडाशिक्षक विजय बिराजदार, एम.जी.हायस्कूलचे क्रीडाशिक्षक चिक्कलगी,तोरणे यांच्या प्रयत्नामुळे तिला तालुका रिंगबॉल संघात स्थान मिळाले.तिने आपले कौशल्य पणाला लावून यात मोठी कामगिरी करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे तिची सांगली जिल्हा रिंगबॉल संघात निवड झाली. इथेही तिने आपल्या कामगिरीची चुणूक दाखवली. सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगलीच्या संघाने विजेतेपद पटकावले.
नंतर तिची निवड राज्याच्या रिंगबॉल संघात झाली. नुकत्याच आंतरराज्यीय रिंगबॉल स्पर्धा बेंगलोर येथे पार पडल्या.या स्पर्धेत तिचा सहभाग असलेल्या राज्याच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर.सी.होर्तीकर, सचिव एस.के.होर्तीकर,मुख्याध्यापक यु. आर. माळी आदींनी तिचे अभिनंदन केले. शाळा आणि ग्रामस्थांनी तिची बेळोंडगी गावातून सवाद्य मिरवणूक काढली.
कु.संजना व्होनमोरे हिला पहिल्यापासून खेळाची  आवड आहे. तिच्या उत्साहामुळे ती सातवीत असताना मुलींचा कबड्डीचा संघ तयार झाला. तिच्या कामगिरीवरच पहिल्याच प्रयत्नानत या संघाने तालुका स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला होता. तिची खेळाविषयीची आवड पाहून मुख्याध्यापक श्री. माळी यांनी क्रीडाशिक्षक चिक्कलगी, अधिक्षक व राष्ट्रीय खेळाडू तोरणे सर आणि कर्की सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिला सराव देण्यात आला. रोज दोन किलोमीटर ती धावत असते. कबड्डी,गोळाफेक आणि धावण्याच्या स्पर्धेतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.तिला तिच्या आई-वडिलांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळाले. तिचे वडील मल्लिकार्जून व्होनमोर शिक्षक आहेत.

No comments:

Post a Comment