Thursday, December 15, 2016

जत साखर कारखाना राजारामबापूने बंद ठेवला


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या विकासाचा मानबिंदू असणारा जतचा डफळे कारखाना सभासदांच्या मालकीचा होण्याचे संकेत मिळत असले तरी या कारखान्याला लागलेले ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे. राजारामबापू साखर कारखान्याने खरेदी केलेले हे युनिट चालू गळीत हंगाम अवघ्या बारा दिवसात बंद ठेवला आहे. उसाची टंचाई, झोनबंदीच्या नावाखाली कारखाना बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी यामागे वेगळी कारणे असल्याचे आता समोर येत आहे. सद्यस्थितीला कारखान्यावर असणारी स्टॉक साखर उचलण्यास प्रारंभ झाला असून, कारखान्याची मशिनरी खोलण्यात येत आहे.
सततचा दुष्काळ, बँक कर्जे, उसाची कमतरता यामुळे जतचा राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना आर्थिक डबघाईला आला होता. तसेच राज्य शिखर बँकेचे कारखान्यावर कर्जे असल्याने अखेर तो पाच वर्षापूर्वी लिलावात निघाला. या लिलाव प्रक्रियेत इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी कारखान्याने जतचे युनिट 47 कोटी 86 लाखाला खरेदी केले होते. त्यानंतर पुन्हा जतेच्या विकासाचा मानबिंदू असणाऱया या कारखान्याचे धुराडे पेटले होते. मागची चार वर्षे हा कारखाना राजारामबापूने ताकदीने चालवला होता.
एकीकडे राजारामबापू कारखान्याने जतचे धुराडे सुरू केले असले तरी या कारखान्याच्या बाबतीत येथील सभासद कुंडलिक दुधाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारखाना विक्रीला आव्हान दिले होते. यापैकी दोन निकाल सभासदांच्या बाजूने लागलेले आहेत. तर अंतिम निकाल मार्च 2017 मध्ये होण्याची शक्यता असून जतचा कारखाना निश्चितपणाने सभासदांच्या मालकीचा होण्याचे संकेत आहेत. तसेच जिल्हय़ातील निनाईदेवी व यशवंत हे दोन्ही कारखाने पुन्हा सभासदांच्या ताब्यात आल्याने जतचा कारखानाही सभासदांना मिळणार याबाबत खात्री निर्माण झाली आहे.
दरम्यान, सभासदांच्या बाजूंनी कुंडलिक दुधाळ यांनी दाखल केलेल्या याचिकेत जत कारखान्याचे सभासदांची संख्या 22 हजार 285 असून, कारखान्याची 202 एकर बिगर शेती जमीन आहे. जरी कारखाना आर्थिक कोंडीमुळे आणि कारखान्यावरच्या कर्जामुळे बंद राहीला असला तरी जत कारखान्याची मालमत्ता ही कर्जापेक्षा जादा आहे. तसेच राज्य बँकेकडून हा कारखाना विक्री होताना, राजारामबापू या एकाच कारखान्याची निविदा आली होती. शिवाय त्यांनी हा कारखाना अल्प किंमतीत खरेदी केला. यात सभासदांचे मोठे नुकसान झाले असून, हा कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा व्हावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. यावरचा अंतिम निकाल मार्च 2017 मध्ये होण्याचे संकेत आहेत.

जत कारखान्याचा हा जांगडगुत्ता सुरू असतानाच यंदा राजारामबापू कारखान्याने ऊसटंचाई व झोनबंदीच्या नावाखाली बारा दिवसात गाळप बंद केले. कारखाना बंद होताच, त्यांनी मशिनरी खोलण्यास सुरूवात केली आहे. येथील स्टॉक साखरही तातडीने हालवण्यात येत आहे. बगॅसची विक्री करण्यात येत असून यामुळे कारखान्यात पुन्हा नवे काय घडणार याबाबत सभासदांमध्ये व कारखाना बचाव समितीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याचबरोबर येथील स्थानिक कामगारांना तोंडी आदेश देऊन कामावरून कमी करण्यात आले आहे. तर कायम असणारे कर्मचारी दुसऱया युनिटकडे हालवले जात आहे. जत कारखान्यावर होणाऱया घडामोडीबाबतही गोपनीयताही पाळण्यात येत आहे.
यंदा जतच्या कार्यक्षेत्रात असणाऱया उस उत्पादक शेतकऱयांनी जत कारखान्यास ऊस देण्यास नकार दिला. कारण गतवर्षी राजारामबापूने जो दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे त्यांना बिले अदा झाली नाहीत.त्यामुळे ऊस शेतकरी नाराज आहेत.

No comments:

Post a Comment