Friday, December 23, 2016

जतची यल्लमा यात्रा मोठ्या उत्साहात सुरूहजारो भाविकांनी फेडला नवस;लाखभर भाविकांनी घेतले दर्शन
जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.काल यात्रेच्या मुख्य दिवसातील पहिला प्रमुख दिवस.हजारोंच्या संख्येने भाविकांनी गंध लेवून देवीची ओटी भरली व आपला नवस फेडला. काल दिवसभरात लाखभर भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.
नवसाला पावणारी देवी म्हणून श्री यल्लमाची सर्वदूर प्रसिद्धी आहे. आपले कार्य विनासायास सफल व्हावे म्हणून भाविक देवीला नवस बोलतात. आपली कार्यसिद्धी झाल्यास या दिवशी भाविक देवीच्या दारात येऊन नवस फेडतो.येथील कुंडात स्नान करून भक्तीभावाने देवीची ओटी भरली जाते.काल हजारोंच्या संख्येने भाविकांनी आपला नवस फेडला.
यात्रा स्थळावर भाविकांची मोठी गर्दी होत असून भाविक लाखोच्या संख्येने दाखल होत आहेत.जत तालुक्यासह मुंबई,पुणे, बेंगळूर, बेळगाव, धारवाड,इंडी,बिदर,सोलापूर आदी परिसरातील भाविक मुक्कामाला येत असतात. तीन दिवस मुक्काम करत दुसर्‍यादिवशी देवीला नैवेद्य दाखवून झाल्यावर तिसर्‍यादिवशी  किच पडल्यानंतर भाविका यात्रा स्थळ सोडतात. जवळपास चार लाखाहून अधिक भाविक यात्रेला हजेरी लावत असते. यात्रा स्थळावर मेवा-मिठाईच्या दुकानांसह सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तू,गरम लोकरीचे कपडे,खेळणी, हॉटेल्स,चायनीज पदार्थ,रसवंतीगृहे आदींची दुकाने,स्टॉल्स थाटली गेली आहेत. करमणुकीच्या साधनांमध्ये पाळणे,डिज्नेलँड,मौत का कुआ,जादूगार,तमाशे दाखल झाले आहेत.यंदाच्या यात्रेवर नोटाबंदीचा कुठलाच परिणाम दिसून येत नाही. उलट यंदा गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक मोठी यात्रा भरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेच्यावतीने प्रथमच कृषी महाप्रदर्शन भरवण्यात आले आहे. आर. आर. पाटील यांच्या नावाने कृषी प्रदर्शन भरवण्याचे योजले असले तरी त्यांचा उल्लेख अजिबात दिसत नाही. उदघाटन पत्रिकेमध्येदेखील जिल्हा परिषदेला व आर. आर.पाटील यांच्या प्रतिमेला स्थान दिले गेले नसल्याने जिल्हा परिषदेने या प्रदर्शनाचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खास बाब म्हणून निधी देण्याचे कबूल केले आहे. प्रदर्शनावर भाजपाची छाप ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 
नेहमीप्रमाणे सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जनावरांचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रा स्थळावर भाविकांसाठी पिण्यासाठी व स्नानासाठी कुंडात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment