Monday, January 16, 2017

जतमधील शाळेत चोरी

जतमधील  शाळेत चोरी
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील शिवानुभव मंडपशेजारी असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतील कीचनमधील सुमारे सात हजार रुपयांची स्वयंपाकाची भांडी रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीला नेली आहेतया प्रकरणी जत पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. शाळेच्या पोषण आहाराची चार मोठी पातेली,त्याची चार झाकणे,लहान दोन पातेली,झारी,चमचे,फिल्टर भांडी,पाच लिटरचा कूकर,हळदपूड,चटणी,तेल असा सुमारे सात हजाराचा ऐवज लूटून नेला आहे.रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कीचनशेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून हा ऐवज नेला आहे.याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

सांगली जिल्ह्यात केवळ दीड टक्के एचआयव्ही रुग्ण
जत,(प्रतिनिधी)-
प्रसारमाध्यमांमधील जाहिराती,पथनाट्ये,ग्रामस्तरावरील समुपदेशक यामुळे एचआयव्ही संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून गेल्यावर्षी तपासणी केलेल्या रुग्णांमधील फक्त दीड टक्के रुग्णांना बाधा झाली असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा एड्स नियंत्रक विवेक सावंत यांनी जत येथील शिक्षकांच्या एड्स जनजागृती कार्यशाळेत बोलताना दिली.
जत येथील रामराव विद्यामंदिर येथे एड्स जनजागृती  कार्यशाळा पार पडली. यावेळी श्री.सावंत बोलत होते. ते म्हाणालेसांगली जिल्ह्यात 2004 मध्ये चाचणी केलेल्या रुग्णांपैकी 24 टक्के रुग्णांना एड्सची लागण झाली होती.2006 पर्यंत त्यात वाढ होत होती,मात्र त्यानंतर जनजागृतीमुळे एचआयव्ही बाधीत रुग्णांची संख्या कमी कमी होत गेली.आजही एचआयव्ही बाधीत रुग्णांची संख्या मिरज आणि जत तालुक्यात सर्वाधिक आहे.सगळ्यात कमी प्रमाण कडेगाव तालुक्यात आहे. 2013 मध्ये तपासणी झालेल्या रुग्णांपैकी1243 जणांना एचआयव्ही झाला होता.त्यात सर्वाधिक 546 एवढे रुग्ण मिरज तालुक्यातील आहेत. त्यानंतर 270 जत तालुक्यात रुग्ण आढळून आले.

87 टक्के एड्स हा असुरक्षित संबंधांमुळे होतो,त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती एड्सवर नियंत्रण आवश्यक आहे. यासाठी शिक्षक,मुख्याध्यापक यांनी गावपातळीवर जनजागृती करावीअसे आवाहनही श्री सावंत यांनी केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शिक्षण विस्ताराधिकारी आर.डी.शिंदे यांनी तर आभार श्री.गेजगे यांनी मानले. यावेळी जत तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्यापक उपस्थित होते.

Wednesday, January 11, 2017

के.एम.हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील के.एम.हायस्कूल आणि ज्युनीअर कॉलेज तसेच शारदा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला स्नेहसंमेलन मेळावा व वार्षिक क्रीडा स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून जत पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सौ.वर्षा डोंगरे उपस्थित होत्या.
सलग तीन दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धांसह विविध कलागुणांना वाव देणार्‍या झालेल्या स्पर्धा आणि स्नेहसंमेलन मेळावा यांची सांगता या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाने झाली. यावेळी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पार पडले.तालुका,जिल्हा,राज्य आणि आंतरराज्य क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंबरोबरच शालेय स्तरावर हस्ताक्षर,वेशभुषा,निबंध,चित्रकला,वक्तृत्व,बौद्धिक अशा विविध स्पर्धांमध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस,पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक सौ.वर्षा डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,कोणतीही गोष्ट आजची उद्यावर ढकलू नका.आजचे काम आजच करा. कष्ट करा,जिद्द बाळगा त्यामुळे तुम्हाला सहज यश मिळून जाईल. वाचन भरपूर करा, हे सांगतानाच त्यांनी आपला आवडीचा छंद जोपासा.कष्ट करण्याच्या दिवसात कष्ट करा. मोबाईल,संगणक आणि टीव्ही याचा अतिरेक टाळा. त्यागोष्टी आपल्यासाठी आहेत. त्याचे गुलाम होऊ नका,असे आवाहनही त्यांनी केले.प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती एम.डी.तवटे यांनी केले. सूत्रसंचालन विजय बिराजदार व सुरेखा हंकारे यांनी केले.आभार मुख्याध्यापक आर.एम. सय्यद यांनी मानले.यावेळी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष धानाप्पा पट्टणशेट्टी,डॉ.मनोहर मोदी,डॉ.विजय पाटील,शिवलिंगापा संख,हिट्टी,चंद्रशेखर गोब्बी,माजी मुख्याध्यापक श्री.उदगिरे,कुंभार,बिराजदार सर,श्री.माचेट्टी,शारदा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे,सौ.सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

युवकांनी वरातीच्या पुढे नाचण्यापेक्षा शास्त्रीय नृत्यात प्राविण्य मिळवावे:यादव


जत,(प्रतिनिधी)-
युवकांनी वरातीच्या पुढे न नाचता एख्याद्या कलेत प्राविण्य मिळवून नावलौकीक मिळवा,असे आवाहन हास्यसम्राट संभाजी यादव(कोल्हापूर)यांनी जत येथील बसव व्याख्यानमालेत बोलताना केले.
जत येथील के.एम.हायस्कूल आणि ज्युनीअर कॉलेज व शारदा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बसव व्याख्यानमालेचे दूसरे पुष्प गुंफताना केले.'हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा' याविषयावर बोलत होते. जग फार सुंदर आहे.त्याचा चांगला उपयोग करा.विविध कलांमध्ये प्राविण्य मिळवा.वरातीपुढे हिडिसपणे नाचन्यापेक्षा शास्त्रीय नृत्यात प्राविण्य मिळवा.त्यामुळे चांगला नावलौकीक मिळेल.चित्रपटात काम करणारे अमिताभ बच्चन काही वरातीपुढे नाचले नाहीत.जगताना हसत रहा.त्यामुळे ताणविरहित जीवन जगता येते. यावेळी त्यांनी विविध वाद्यांचे,नेते-अभिनेते यांचे तसेच प्राणी-पक्षी यांचे आवाज काढून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.विनोदी चुटके,प्रसंग सांगून हसवून सोडले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एम.सय्यद यांनी केले.पाहुण्यांची ओळख डी.एम.माळी यांनी करून दिली.सूत्रसंचालन भूषण माने व बिराजदार यांनी केले.आभार श्रीमती एम.डी.तवटी यांनी मानले.यावेळी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धानाप्पा पट्टणशेट्टी,डॉ.मनोहर मोदी,माजी पं.स.माजी सभापती आर.के.पाटील,डॉ.विजय पाटील,शिवलिंगापा संख,हिट्टी,चंद्रशेखर गोब्बी,डॉ.अशोक मोगली,नगरसेवक परशुराम मोरे आदी उपस्थित होते.