Wednesday, September 19, 2018

सोलर सिस्टीमचे अनुदान देण्याच्या बहाण्याने शेतकर्‍याला 20 लाखाला गंडवले


जत,(प्रतिनिधी)-
शेतात सोलर सिस्टीम बसवण्यासाठी शासकीय अनुदान मिळवून देतो, असे सांगून कोसारी (ता. जत) येथील अप्पासाहेब गळवे या शेतकर्याला 20 लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी चौघांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारत गणपतराव हापसे (रा. उजळाईवाडी ता. करवीर), सचिन वसंत सकटे (रा. बरगेवाडी ता. करवीर), नागेश शिवाजी चौगुले (रा. गडहिंग्लज) व जयंत घोलप (लक्ष्मीनगर,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अप्पासाहेब गळवे यांची कोसारीत शेती आहे. जानेवारी 2018 त्यांची सचिन प्रल्हाद जगताप यांच्याशी ओळख झाली. त्यांनी माझे मित्र रिलायबल सोलर सिस्टीम कंपनीत काम करतात, ते सोलर सिस्टीम बसवून शासकीय अनुदान मिळवून देतात, असे सांगितले. अनुदान मिळत असल्याने गळवे सोलर सिस्टीम बसवण्यास तयार झाले. 24 जानेवारी 2018 रोजी भारत हापसे, सचिन सकटे, नागेश चौगुले व जयंत घोलप यांनी जमिनीची पाहणी करून याठिकाणी सोलर सिस्टीम बसवता येते व मोठे अनुदान मिळत असल्याचे सांगितले.तसेच सोलर सिस्टीम बसवल्यानंतर काय काय फायदा मिळतो, याची माहितीही दिली.
सिस्टीम पूर्ण बसवण्यासाठी व अनुदान मिळवण्यासाठी खर्च येत असल्याचे पटवून दिले. सुरुवातीला गळवे यांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र व सातबारा उतारा ही कागदपत्रे घेऊन गेले. कामासाठी म्हणून वेळोवेळी गळवे यांच्याकडून थोडे थोडे करत 20 लाख रुपये उकळले. अनेकवेळा संपर्क साधूनही सोलर सिस्टीम बसवेनात व अनुदानही मिळेना. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सचिन जगताप याच्याशी संपर्क साधला. या दोघांनीही त्यांना कॉल केला,पण चौघांचेही फोन बंद झाले होते.
त्यामुळे शेवटी गळवे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जत पोलिसांना दोले. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलिस निरीक्षक कांबळे करीत आहेत.No comments:

Post a Comment