Thursday, September 27, 2018

पशुधनकडील 76 पदे रिक्त: खासगी डॉक्टरांची चलती

सांगली जिल्ह्यातील चित्र;ग्रामीण अर्थकारणावर परिणाम
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात कोंबड्यांची संख्या सोडल्यास जनावरांची संख्या सुमारे 14 लाख इतकी आहे. पोल्ट्रीफार्म आणि अन्य देशी,हायब्रीड कोंबडयांची संख्या जवळपास 21 लाख आहे. जिल्ह्यातील ग्रामीण विशेषता दुष्काळी भागातील अर्थकारण या पुरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र विविध आजार, दुष्काळ आदींमुळे बळी जाणार्या जनावरांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शेतकर्यांना सातत्याने आर्थिक फटाक्याला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात पशुधन विभागाकडील सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहे. याचा फटका शेतकर्यांना बसत आहे.

     2012 मध्ये झालेल्या पशुधन गणनेनुसार सांगली जिल्हयात तब्बल 13 लाख 82 हजार 723 पशुधन आहे. यामध्ये गाय, म्हैस, शेळया, मेंढया, डुकरे, घोडे, गाढवे, खेचर आणि कुत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय परसदारातील आठ लाख 86 हजार 23 आणि पोल्ट्री फार्ममधील 21 लाख 39 हजार 572 कोंबडयांची संख्या आहे. यातील सर्वाधिक पशुधनांची संख्या  जत तालुक्यात आहे. दुष्काळी भागातील शेतकर्यांचे अर्थकारण शेती व्यवसायाबरोबरच पशुधनाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतीपेक्षा शेतकर्यांना जनावरांच्या संगोपनामुळे मोठा हातभार मिळाला आहे. मात्र एकीकडे दुधाचे प्रचंड उतलेले दर आणि दुसरीकडे जनावरांना वैद्यकीय उपचाराअभावी होणारे नुकसान यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ना शेतीची, ना पशुधनाची साथ यामुळे शेतकर्याची अवस्था फार वाईट झाली आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात जनावरे दगावत आहेत. पशुधन वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची वानवा असल्याचा फटका बसत आहे. याचा लाभ खासगी डॉक्टर घेत असून त्यांच्याकडून अक्षरश: लोबाडणूक सुरू आहे.
जिल्हयात जिल्हा परिषद आणि राज्य शासन अख्यत्यारितील 154 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यापैकी तब्बल 76 पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंधर्वन विभागाचे 102 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये 85 दवाखाने हे पशुधन विकास अधिकारी या पदाची आहेत यापैकी 37 दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी पदे कार्यरत आहेत. तर 48 पदे रिक्त आहेत. शिवाय राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे 52 दवाखाने कार्यरत असून यापैकी 28 दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाऱयाची पदे रिक्त आहेत. साहजिकच शेतकर्यांना त्यांच्या जनावरांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरावरच अवलंबून राहावे लागत आहे. ही मंडळी याचा पुरेपूर लाभ उठवत शेतकर्यांची अक्षरश: आर्थिक पिळवणूक करीत असून राज्य शासनाने पशुधनकडील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
    पशुधन जनगणनेनुसार जिल्हयात 14 लाख पशुधन आहे. यामध्ये जत तालुक्यात तीन लाख दोन हजार 515 पशुधन आहे. वाळवा तालुक्यात एक लाख 65 हजार 567, आटपाडी तालुक्यात एक लाख 54 हजार 797, कवठेमहांकाळ तालुक्यात एक लाख 32 हजार 137, मिरज तालुक्यात एक लाख 16 हजार 361 पशुधनाची संख्या आहे. सर्वाधिक पशुधन हे दुष्काळीपट्टयात अधिक असले तरी या तालुक्यातून पशुधन विकास अधिकाऱयांची पदे मात्र मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. साहजिकच याचा आर्थिक फटका शेतकर्यांना बसत आहे.

No comments:

Post a Comment