Monday, September 10, 2018

बिळूर,देवनाळ बंदिस्त कालव्यासाठी 91 कोटींची निविदा


म्हैसाळ योजनेचे काम वर्षभरात पूर्ण होणार: आम. जगताप
जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बिळूर,देवनाळ कालव्याच्या बंदिस्त जलवाहिनीच्या कामासाठीची 91 कोटींची निविदा निघाली असून कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या वर्षभरात काम पूर्ण होईल, अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.

 जत तालुक्यात कृष्णेचे पाणी आणण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आघाडी सरकारच्या काळात या योजनेसाठी एक पैसाही खर्च करण्यात आला नाही,मात्र भाजप सत्तेवर आल्यावर या योजनेला निधी देण्यात आला. तालुक्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मी स्वत: आणि खासदार संजयकाका पाटील पाठपुरावा करत आहोत. या योजनेच्या कामांना गती देण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजनेत या म्हैसाळ योजनेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मोठा निधी प्राप्त झाला आहे.
आम. जगताप म्हणाले, मुख्य कालव्याचे काम प्रगतीपथावर आहे.कालव्याचे खोदकाम व पुलांचे बांधकाम येत्या दोन महिन्यात पूर्ण होतील.बिळूर व देवनाळ कालव्याचे खोदकाम अंतीम टप्प्यात आले आहे. अंकले व खलाटी पंपगृहांचेही काम पूर्ण होत आले आहे. देवनाळ भाग एक व दोन तसेच बिळूर भाग दोन या बंदिस्त कालव्याच्या जलवाहिनी टाकण्याचे काम लवकर सुरू होईल. या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. देवनाळ विस्तारित कालवा साडेबारा किलोमीटरचा आहे. यात उंटवाडी, वळसंग लघुवितरिका तसेच देवनाळ, अमृतवाडी आणि सालेकिरी उपलघुवितरिका यांचे काम होणार आहे.
देवनाळ भाग दोनमधील खलाटी लघुवितरिका आणि बिळूर वितरिकेसाठी 11 कोटी 16 लाख रुपये खर्च होणार आहे. बिळूर कालवा भाग दोन मधून निघणार्या मिरवाड वितरिका व त्याच्यावरील लघुवितरिका यासाठी 29 कोटी 27 लाख रुपये खर्च होणार आहेत. त्याचबरोबर मंगळवेढा (जि. सोलापूर) वितरिकेच्या 9 किलोमीटर कामाची निविदाही काढण्यात आली आहे.यासाठी 8 कोटी 48 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, असे आम. जगताप म्हणाले.
पूर्वभागाला कर्नाटकातून पाणी
जत तालुक्याला म्हैसाळ उपसा सिंचन योजनेबरोबरच कर्नाटकातूनही पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कर्नाटकातील मंत्र्यांशी बोलणी सुरू आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे ही प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. यापूर्वी कर्नाटक मुख्यमंत्री व मंत्र्यांशी चर्चा झाली होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता, असे आम. जगताप म्हणाले.

No comments:

Post a Comment