Friday, September 14, 2018

जत तहसील आवारातून वाळूचा ट्रक पळविला


जत,(प्रतिनिधी)-
वाळू तस्करी करणारा ट्रक जतच्या तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करून आणून लावण्यात आला होता. पण वाळू तस्कर करणार्या इसमाने मंडल अधिकारी व महसूल कर्मचार्यांना दमदाटी करत वाळूचा ट्रक पळवून नेला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जत तहसीलकडे नव्याने रुजू झालेले तहसीलदार सचिन पाटील यांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम मोठ्या जोमाने हाती घेतले आहे. दरम्यान, बुधवारी रात्री तालुक्यातील अचकनहळ्ळी मार्गाने वाळूच्या गाड्या येत असल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाली. तहसीलदार श्री.पाटील यांच्या आदेशानुसार मम्डल अधिकारी संदीप मोरे, तलाठी श्री. भोसले,सिद्धू बोगार व कोतवाल श्री. येळदरी यांनी रात्री पावणे बाराच्यादरम्यान ही वाळूची गाडी पकडली. ही गाडी कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील कुंभार नावाच्या वाळूतस्कराची आहे.
ही गाडी पकडून तहसील कार्यालयात आणण्यात आली. मात्र काही तासांतच म्हणजे गुरुवारीच्या रात्री दोनच्या दरम्यान गाडीचा मालक कुंभार आला आणि त्याने मंडल अधिकारी व कर्मचार्यांना दमदाटी करत गाडी ताब्यात घेतली आणि ती घेऊन गेला. या प्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने महसूल कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.No comments:

Post a Comment