Thursday, September 13, 2018

जत पंचायत समितीला गटशिक्षणाधिकारी मिळेना


जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीला गेल्या दोन वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. सध्या तालुक्याच्या शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार मिरजेचे गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधने यांच्याकडे आहे. त्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज सांभाळून या पदाचीही जबाबदारी पार पाडावी लागत आहे.
जत तालुक्यात केंद्रप्रमुखांसह 1564 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यात केंद्रप्रमुख 28, वरिष्ठ मुख्याध्यापक 74, पात्र पदवीधर 277 आणि सहाय्यक शिक्षक 1185 अशी एकूण 1564 पदे मंजूर आहेत. यापैकी 1312 शिक्षक कार्यरत आहेत. तर 252 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यातील 70 आंतरजिल्हा बदलीने जाणार्या शिक्षकांचा समावेश आहे. याशिवाय माध्यमिकच्या 64 शाळा आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक असे मिळून 70 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा सर्वात मोठ्या शिक्षण विभागाला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी उपलब्ध नसल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
याशिवाय शिक्षण विभागात फक्त एकच क्लार्क उपलब्ध आहे. त्याच्यावर या सर्व शिक्षकांच्या कामाची जबाबदारी असल्याने सध्या या विभागात एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार दिसत आहे. चार क्लार्कच्या जागी फक्त एकच क्लार्क शिवाय हा क्लार्क सतत आजारी असतो.त्यामुळे शिक्षकांची अनेक कामे प्रलंबित पडली आहेत. शिक्षकांची सेवा पुस्तके अद्ययावत करणे, चट्टोपाध्याय प्रकरणे, प्रलंबित वैद्यकीय बिले अशी किती तरी कामे प्रलंबित आहेत. सभापती मंगल जमदाडे यांनी वारंवार शिक्षण वुभागातील पदे भरण्यासंदर्भात मागणी केली आहे,मात्र याबाबत शासन दरबारी काहीच हालचाल होत नसल्याने सर्वच पातळीवर नाराजीचा सूर निघत आहे. सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील हे जत तालुक्यातील आहेत. पण तरीही जतला गटशिक्षणाधिकारी, क्लार्क आणि शिक्षक मिळत नाही. हे मोठे दुर्दैव असल्याचे म्हटले जात आहे.

No comments:

Post a Comment