Tuesday, September 11, 2018

लोककला आणि लोकगीतांमधला भावणारा गणेश

जत,(प्रतिनिधी)-
गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. माणसं एकत्र आणणारा असा हा ऊर्जावर्धक सण लहानथोरांना सर्वांनाच आवडतो. उत्सव काळ हा मंगलमय होऊन जातो.मात्र गणेश देवाचे अस्तित्व फक्त गणेशोत्सव काळापुरते मर्यादित नाही. सर्वच लोककला आणि लोकसंगीतामध्ये गणेशाचा उल्लेख प्रामुख्याने होत असतो. कारण सर्व कलांचा नायक हा गणेशच आहे.
सर्व कलांचा अधिनायक किंवा स्फूर्तिदेवता म्हणून कोणत्याही कला प्रकाराची सुरुवात गणपती पूजनाने किंवा गणेश वंदनेने करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. नाटकाआधी 'नांदी', तमाशातील 'गण' आणि दशावतारातील 'नमन' झाल्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात होते. त्यामुळे लोककला आणि लोकसंगीतातही आपल्याला 'गणपती बाप्पा' पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील जागरण, गोंधळ, भारूड, दशावतार, लळीत, कलगीतुरा, पोवाडा, तमाशा, लावणी, खडी गंमत अशा विविध लोककला प्रकारांत आणि लोकसंगीतांत गणेशस्तुती आणि गणेशवर्णन करण्यात आलेले आहे. हदगा किंवा भोंडला यामध्येही गणपतीची गाणी आहेत. 'ऐलमा पैलमा गणेश देवा । माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा' अशी विनवणी गणपतीला करण्यात आली आहे.
शाहीर पठ्ठे बापूराव यांनी 'आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो!' असे म्हटले आहे.
कोणत्याही कलेमध्ये 'चौदा विद्या आणि चौसष्ट कला' यांचा अधिपती असलेल्या गणपतीचे महत्त्व पठ्ठे बापुराव यांनी अधोरेखित केले आहे. याच पठ्ठे बापुरावांनी 'लवकर यावे सिद्ध गणेशा । आतमधी कीर्तन वरून तमाशा।। माझा भरवसा तुम्हावर खासा। विघ्न पिटविशी दाही दिशा।।' अशी प्रार्थनाही गणपतीला केली आहे. शाहीर हैबती घाटगे यांनी 'श्री गजानन गणपती मंगलमूर्ती, द्यावी मज मती समारंभाला' असे म्हटले आहे. तर काही गणांमध्ये 'हे गणनायक सिद्धिविनायक वंदन पहिले तुला गणेशा, रसिकजनांनी भरले अंगण व्हावे मनाच्या त्यांच्या रंजना, लवकर यावे, दर्शन द्यावे घ्यावे जवळी एकच आशा' असे म्हटले आहे.
'थापाड्या' या चित्रपटातील 'हे शिवशंकर गिरिजा तनया गणनायका प्रभुवरा, शुभकार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्‍वरा' हे रामदास कामत यांनी गायलेले गाणे लोकप्रिय आहे.
नांदी, गण गौळणींतून तसेच पोवाडे, आरत्यांमधून बाप्पाचे स्तवन होत असते. तुम्ही गवरीच्या नंदना विघ्न कंदना या नाचत रंगणी जी जी.. घरादारांतूनही गणपतीच्या स्तवनाची, त्याच्या आळवणीची कवने प्रसंगानुसार रचली जात असतात. घरात शुभकार्य काढले की पहिला मान गणपतीचा आणि लग्न-विवाहासारख्या प्रसंगात तर ठायी ठायी बाप्पाला नमन, त्याची आठवण काढलेली आढळून येते. त्याला घरातील ज्येष्ठाचा मान असतो.
सहसा असे दिसून येते की, समाजात स्त्रिया आपल्या लोकगीतांचा मोठा ठेवा जपतात, पुढे नेतात, अनेक पिढय़ा जतन करतात, त्यात भर घालतात. अनेक प्रचलित लोकगीते नीट काळजीपूर्वक अभ्यासली, तर त्यांच्या रचयित्या या स्त्रिया असाव्यात, असा कयास बांधता येतो. मात्र, त्यास कोणता ठोस आधार नाही. परंतु लोकगीतांतून आलेले दाखले, उदाहरणे पाहू जाता ती स्त्रियांनी रचली असावीत, असे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे. त्यातील सूक्ष्म विनोदही वाखाणण्यासारखा आहे. मग त्यातून बाप्पाही सुटत नाहीत. अशा या गणेशाचे मंगलमय वातावरण आता सुरू होत आहे.

No comments:

Post a Comment