Thursday, September 13, 2018

प्रत्येक गावाला कृषी विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करा: सुशीला होनमोरे


जत,(प्रतिनिधी)-
शेतीविषयक विविध योजना आणि अनुदान योजना राज्य व केंद्र शासनाकडून राबवल्या जात असतात.मात्र कर्मचार्यांच्या अपुर्या संख्येमुळे आणि योजना शेतकर्यांपर्यंत व्यवस्थित पोहचत नसल्याने याचा लाभ शेतकर्यांना होत नाही. त्यामुळे प्रत्येक गावात कृषी विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीला होनमोरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या कृषीप्रधान राज्यात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या पर्ज्यनमान, हवामान आणि खालावत चाललेल्या आजारभावामुळे शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे.त्यामुळे शेतकरीदेखील आता शेतीपासून दूर जात चालला आहे. शासन शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक शेततळे, मागेल त्याला शेततळे, शेडनेट, पॉलिहाऊस, फळबाग योजना, ठिबक सिंचन योजना, अनुदानावर शेती औजारे, पीकविमा यांसारख्या अनेक योजना राबवित आहे.मात्र या योजना शेतकर्यांपर्यंत वेळेत आणि पूर्ण क्षमतेने पोहचत नाहीत.
आज एका कृषी सहाय्यकाकडे तीन ते चार गावांचा कार्यभार आहे. त्यामुळे सहाय्यक कुठल्या तरी एका गावात जातात, कुठे तरी एखादा फलक लिहितात व भेटेल त्याला माहिती सांगतात. अर्थात यात त्यांचा दोष नाही. त्यांना सर्व गावात तळागाळापर्यंतच्या शेतकर्यांपर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहेत. त्यांना संपूर्ण वेळ एका गावासाठी देता येत नाही. त्यामुळे ज्याला या योजना समजल्या, तोच त्याचा लाभ घेतो. सर्वसामान्य लोकांना, शेतकर्यांना योजना समजेपर्यंत मुदत संपलेली असते.यामुळे असंख्य शेतकरी हे या अनेक योजनांपासून पात्र असूनही वंचित राहतात.
त्यामुळे शासनाने एका कर्मचार्यास एकच गाव द्यावे व त्या गावात कृषी विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करावे. यामुळे सर्व शेतकरी बांधवापर्यंत निर्धारित वेळेत ही माहिती पोचेल आणि एकही शेतकरी या शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असेही निवेदनात सुशीला होनमोरे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment