Thursday, September 20, 2018

डफळापुरात शिंदीची तपासणी करायला गेलेल्या पोलिसांना कोंडले

जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर (ता.जत) येथील एका शिंदीच्या दुकानात भेसळयुक्‍त शिंदीची तपासणी करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला कोंडून घालून धक्‍काबुक्‍की केल्याचा खळबळजनक प्रकार  काल सायंकाळी घडला आहे. या प्रकरणी यमण्णाप्पा यलगार, राजू यलगार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. भेसळीचा संशय असलेली दोन बॅरल शिंदी जप्त केली आहे.
     डफळापूर येथे भेसळयुक्‍त शिंदी विक्री केली जात असल्याची तक्रार पोलिस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्याकडे  करण्यात आली होती. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिस पथकाने छापा टाकला. पथकात सहाय्यक उपनिरीक्षक वासुदेव साळुंखे,  ढोंबरे, यमगर,सुनिल व्हनखंडे, गोपाल राठोड हे कर्मचारी होते.
     पोलिसांनी शिंदी विक्रीचा परवाना आहे का, यांची चौकशी केली.  कागदपत्रांची मागणी केली.  त्यावेळी यमण्णाप्पा यलगार, राजू यलगार यांनी पोलिसांना धक्काबुकी केली. तसेच शिंदीच्या दुकानात कोंडून घातले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सुटका करून घेतली. तसेच दोन शिंदी विक्रेत्यांना पकडले. भेसळीचा संशय असलेली त्यांच्याकडील दोन बॅरल शिंदी जप्त केली.शिंदी विक्रेत्यांवर 353, 342 कलमानुसार कारवाई केली आहे.
    उपअधिक्षक वालावलकर म्हणाल्या, शिंदी विक्रेत्यांची मुजोरी वाढली आहे. डफळापूर येथे शिंदी विक्रीचा एक परवाना असताना चार ठिकाणी शिंदी विकली जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांना कडक शासन केले जाईल.

No comments:

Post a Comment