Saturday, September 8, 2018

जत तालुक्यातील शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

जत तालुक्यातील  शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

हवामान अंदाज चुकला; रब्बी पिकांवरही होणार परिणाम
जत,(प्रतिनिधी)-
भारत हा कृषी प्रधान देश आहे येथील अधिकतर नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहेत. तसेच भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र, मागिल काही वर्षांपासून सुखा, ओला दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यावर शेतकर्‍यांची परीस्थिती फारच दयनिय स्वरुपाची होत आहे, अशीच परिस्थिती पुन्हा यावर्षी जत तालुक्यातील शेतकर्‍यांची झालेली आहे. 
पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले. तरीही जत तालुक्यात एकही मुसळधार पाऊस न पडल्यामुळे येथील नदी, नाले, विहिरी, तलाव अजुनही कोरडेच असल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. यामुळे परिसरात दमदार पाऊस केव्हा पडणार? या प्रतिक्षेत शेतकरी चिंतातूर झाला आहे.
यावर्षी हवामान खात्याने दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, मागिल तीन महिण्यांपासून हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरत आहे. जत तालुक्यात फक्त 190 मी. मी. पाऊस पडला असल्याची माहिती मिळाली असून, या तालुक्यात दमदार पाऊस न पडल्यामुळे व अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे शेतातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. यंदाचा खरिप पूर्णपणे वाया गेला आहे.

ग्रामीण भागात असलेल्या नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती असल्यामुळे यावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. यातही अनेक शेतकर्‍यांची शेती कोरडवाहू असल्यामुळे त्यांची शेती निसर्गाच्या पावसावरच अवलंबून असते. मात्र मागील तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय हलाकीची होत चालली आहे. त्यामुळे तो कर्जाच्या बोजाखाली दबत चालला आहे. यामुळे शेती कशी करावी मुलाबाळांचे शिक्षण, लग्न व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, अशाप्रकारचे अनेक संकट शेतकर्‍यांसमोर उभे टाकले आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने नदी, नाले, विहिरी व तलाव कोरड्या स्थितीत आहेत. यामुळे याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर पडणार असल्याने खरिप पीक तर गेलेच शिवाय रब्ब्बी पिकाचीसुद्धा आशा नसल्याने परिसरात सर्वे करून शासनाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

No comments:

Post a Comment