Sunday, September 23, 2018

पेट्रोलपंप चालकांनी दिशादर्शक फलक लावावेत


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील पेट्रोलपंप चालकांनी आपल्या पेट्रोलपंपावर दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. शहरातील पेट्रोलपंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यास येणार्या दुचाकी,चारचाकी वाहनांची सारखीच वर्दळ असते.पण वाहने तेल भरण्यासाठी दोन्ही दिशांकडून येत असल्याने वाहनांची कोंडी होते आणि वाद निर्माण होतात. त्यामुळे कोणत्या तरी एका बाजूने वाहने येण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जत शहरातील कोणत्याच पेट्रोलपंपावर शिस्त नाही. अनेक सुविधा नाहीत.तरीही त्यांचा बिनबोभाट व्यवसाय सुरू आहे. यावर ग्राहकांची कमालीची नाराजी आहे. घाईगडबडीत असलेल्या लोकांना लवकर पेट्रोल भरून जायचे असते.पण पंपावर शिस्त नसल्याने समोरूनही वाहने येतात आणि पाठीमागूनही वाहने येतात.यामुळे तेल भरून घेतलेल्या गाड्यांना पुढे जायला वाट नसते. त्यामुळे विनाकारण ताटकळत उभे राहावे लागते. समोरच्या गाडीत तेल भरल्याशिवाय त्याची सुटका होत नाही.
कधी कधी ग्राहकांमध्ये वाद होतात. अशा वेळेला पंपावरचे कामगार हा तमाशा बघत बसतात.यावर ते काहीच तोडगा काढत नाहीत. दिशादर्शक फलक नसल्याने वाहनाधारकांनासुद्धा कोणत्या दिशेने जाऊन तेल भरावे, याचे मार्गदर्शन मिळत नाही. कामगार याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. याचा त्रास मात्र ग्राहकांना होत आहे.
पेट्रोल-डिझेल पंपावर ग्राहकांच्या सेवेसाठी काही सोयी-सुविधा असणे बंधनकारक कारक आहे. मात्र तशी काहीच सुविधा जतच्या पंपावर आढळून येत नाही. वाहनांमध्ये हवा भरण्यासाठीची नि:शुल्क सोय हवी आहे. थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय हवी. त्याचबरोबर शौचालय आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था असणे बंधनकारक आहे. मात्र जतमधल्या पेट्रोलपंपांवर अशा सोयीच दिसत नाहीत. त्यामुळे अडचणीत आलेल्या लोकांची गैरसोय होत आहे. या पंप चालकांवर कोणाचेच नियंत्रण नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment