Tuesday, September 25, 2018

जत पंचायत समिती शिक्षण विभागाला पूर्ण वेळ लिपिक द्या: 'शिक्षक भारती'ची मागणी

जत, (प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या सभापती  सौ मंगलताई जमदाडे  यांची नुकतीच 'शिक्षक भारती' च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.शिक्षण विभागाला पूर्ण वेळ लिपिक मिळावा,यासाठी जोर धरण्यात आला.
    जत तालुक्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या सर्वात मोठी असून त्यांची अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. शिक्षण विभागात पुरेसे लिपिक नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या विभागात फक्त एक वरिष्ठ लिपिक आहे. एक लिपिक तीन दिवस जतला येतो. उरलेले दिवस कवठेमहांकाळ येथे असतो. पण यामुळे शिक्षकांची कामे होताना दिसत नाहीत. बाराशेच्यावर शिक्षक संख्या जत तालुक्यात आहे.त्यामुळे पूर्ण वेळ लिपिक मिळण्याची आवश्यकता आहे.
शिक्षकांची सेवापुस्तके  अद्यावत करण्यासाठी केंद्र स्तरीय कॅम्प लावून शिक्षकांच्या विविध प्रकारच्या नोंदी सेवा पुस्तकात करण्याची आवश्यकता आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही कँप लावला जात नाही. तरी कँप लवकर लावण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली.        
दीड वर्षांपूर्वीं वरिष्ठ वेतन श्रेणी प्राप्त शिक्षकांची सेवा पुस्तके पडताळणी साठी सांगलीला पाठवून त्यांचा फरक तात्काळ मिळावा,शिक्षकांचे वैद्यकीय देयके, पगार बिले ,प्रसूती रजा, अन्य विविध प्रकारची बिले तात्काळ निकाली निघावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.या सर्व विषयावर सभापती मंगलताई  जमदाडे यांनी लवकरच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू,असे सांगितले.
        यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष  अध्यक्ष दिगंबर सावंत,मल्लय्या नांदगाव,सरचिटणीस शौकत नदाफ, हाजी पठाण, नवनाथ संकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment