Thursday, September 13, 2018

धावडवाडीच्या जनतेला इमदाद फौंडेशनकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा


जत,(प्रतिनिधी)-
  जत तालुक्यातील धावडवाडी येथे इमदाद फौंडेशनच्यावतीने शुध्द पेयजल प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे या गावातील लोकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. सध्या पाऊस नसल्याने लोकांना पिण्याच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आता दुष्काळाला सामोरे जावे लागणार्या या जनतेला काहीसा दिलासा दिला आहे.
जत तालुक्यील पाणीटंचाईची भीषणता कोणत्या टोकाला जाते, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मिळेल त्या ठिकाणचे पाणी प्यावे लागल्याने आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्याची वेळ येणार्या धावडवाडीच्या जनतेला शुध्द पेयजल प्रकल्प म्हणजे एक पर्वणीच मानली जात आहे. धावडवाडीतील मूळचे राहणारे; पण नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने बाहेर असलेल्या मंडळींनी गावाशी नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अद्यापही गावातच राहावे लागत असलेल्या बांधवांना किमान पाणीतरी शुध्द मिळावे, असा उद्देश ठेवून साकारण्यात आलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सिकंदर जमादार हे होते. प्रास्ताविकात फौंडेशनचे अध्यक्ष अख्तरमियाँ शेख यांनी या उपक्रमामागचा उद्देश सांगितला. काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष आप्पाराया बिरादार, आकाराम मासाळ, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, अभिजित चव्हाण, श्रीनिवास भोसले, दिग्विजय चव्हाण, अय्याज शेख, चंदुलाल शेख, महंमद शेख, रफीक शेख, काका शिंदे, नाना सूर्यवंशी आदी होते.

No comments:

Post a Comment