Sunday, September 30, 2018

आश्रमशाळांची चौकशी होणार असल्याने संस्थाचलाकांचे धाबे दणाणले


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातल्या कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थीनींवर झालेल्या लैगिंक अत्याचराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच आश्रमशाळांची कसून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. हकनाक कर्मचार्यांना वेठीस धरून त्यांची पिळवणूक करणार्या आणि विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याची चर्चा होत आहे.
राज्यात अनेक ठिकाणच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना सातत्याने होत असून त्यामुळे गरीब घरच्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संस्थाचालक, शिक्षक त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन लैंगिक अत्याचार करत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. सांगली जिल्ह्यातल्या कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेतही अशा प्रकारची अत्याचारे झाल्याचे उघड झाल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संस्थेचा चालकच या मुलींचे लैंगिक शोषण करत होता. सध्या तरी फक्त सात मुलींवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. याची अजून चौकशी सुरू आहे. या घटनेने जिल्हा हादरला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण आश्रमशाळांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारी कार्यालयातील विविध खात्यांच्या महिला अधिकारी आणि कर्मचार्यांची पथके नियुक्त करून त्यांच्यामार्फत ही चौकशी होणार आहे. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन कवले यांच्या माहितीनुसार जिल्ह्यात 39 आश्रमशाळा आहेत. सर्वच आश्रमशाळांचा कारभार संशयास्पद आहे. याबाबत सातत्याने समाजात चर्चा होत असते.पण त्याबाबत पुढील कार्यवाही कधीच झाली नाही. वास्तविक कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेतील मुलींवर संस्थाचालक अरविंद पवार हा नराधम अत्याचर करत असल्याचे एका निनावी पत्राद्वारे उघडकीस आले. त्याचा उद्रेक सर्वत्र झाला असून जिल्ह्यातील सर्वच आश्रमशाळांची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. त्यानुसारच आता सर्व आश्रमशाळांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.यामुळे साहजिकच संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यातल्या अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण होत असल्याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर काही संस्थाचालक शिक्षक, कर्माचारी यांचीही अधिक काम लावून पिळवणूक होत असल्याची चर्चा होत आहे. मुलांसाठी बायोमेट्रिक हजेरी असली तरी त्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे. महिन्याच्या शेवटी सर्वच मुलांची उपस्थिती शंभर टक्के लावली जाते,मात्र कर्मचार्यांना याच्या नावाखाली आर्थिक आणि मानसिक त्रास दिला जातो. अनेक कर्मचार्यांना संस्थाचलाकाच्या घरी पाणी भरण्यासारखी कामे करावी लागत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांना शाळांमध्ये थांबवून कामाला लावले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के लावली जाते,यात काही अधिकारीदेखील सामिल असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासनानेही आश्रमशाळांच्या चौकशीचे उचललेले पाऊल कडक स्वरुपात घेण्याची आवश्यकता आहे. मुलींची त्यांना विश्वासात घेऊन चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कर्मचार्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. यातून सर्व काही आलबेल आहे, असे बाहेर पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.No comments:

Post a Comment