Tuesday, September 25, 2018

विहिरीमुळे सोन्याळ-जाडरबोबलाद रस्ता धोकादायक बनला

जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील सोन्याळ-जाडरबोबलाद रस्त्याला अगदीच घासून एक जुनी पडकी विहीर आहे. चार दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे विहीर खचल्याने रस्त्याला लागून मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तात्काळ विहीर मुजवून  संरक्षक कठडा बांधावा,अशी मागणी होत आहे.
  विजयपूर-पंढरपूर असा हा मार्ग असून या मार्गावर यत्नाळ, तिकोंडी,  संख, अंकलगी ,सोन्याळ  जाडरबोबलाद, मारोळी, भुयार चिकलगी,निंबोणी, भाळवणी, मंगळवेढा अशी महत्वाची गावे येतात. ऐतिहासिक व आध्यात्मिक  गावांना आणि शहरांना जोडणारा हा मधला मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ भरपूर असते.  याचमार्गावर  सोन्याळ-जाडरबोबलाद या  गावादरम्यान सोन्याळ जवळ एक जुनी पडकी विहीर आहे. विहीर अगदी रस्त्याला घासून असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे.  संभाव्य धोका ओळखून विहिरीवर संरक्षक कठडा बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
 मागीलवर्षीही पावसाच्या पाण्यामुळे ही विहीर खचून धोका निर्माण झाला होता. नुकतेच चार दिवसांपूर्वी या भागात पाऊस झाल्याने आणखीन जास्तच विहीर खचून रस्ता धोकादायक बनला आहे. यामुळे कधी अपघात होईल याचा नेम नाही. तीन वर्षापूर्वी एक ट्रॅक्टर  विहिरीत पडून अपघात झाला होता.या रस्त्याच्याजवळ अनेक छोटे-मोठे अपघात होतात; पण या समस्येकडे स्थानिक  प्रशासन  दुर्लक्ष करत आहे. या विहिरीवर  संरक्षक कठडा बांधावा किंवा  पडकी विहिर बुजविण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याच रस्त्यावर गारळेवाडी क्रमांक २ जवळही या रस्त्याला लागून एक पडकी विहीर आहे त्या विहिरीवर संरक्षक कठडा बांधण्यात आला असला तरी निम्म्याहून अधिक रस्ता खचलेला आहे. ही विहीर मुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावा, अशीही मागणी आहे. सोन्याळ फाटा ते जाडरबोबलाद रस्त्याची लांबी ८ किलोमीटर आहे. काही वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. परंतु रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढली आहेत. ती वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहेत. ती तोडून टाकण्याची मागणी होत आहे.
(रस्त्याकडील विहिरीमुळे सोन्याळ-जाडरबोबलाद रस्ता खचत चालला आहे.)

No comments:

Post a Comment