Saturday, September 29, 2018

खलाटीच्या तरुणाच्या खूनाचा उलघडा

त्रास देत असल्याने केला खून
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील खलाटी येथील एका तीस वर्षीय तरूणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची  घटना 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली होती. या खूनाचा उलघडा झाला असून आरोपी  रावसाहेब तुकाराम शिंदे (वय 45,रा. खलाटी) यास जत पोलिसांनी आरेवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथून अटक केली. मयत खंडू सिद्धू नाईक हा आपल्याला दारू व तंबाकूसाठी त्रास देत होता, अशी कबुली आरोपी रावसाहेब शिंदे याने दिली आहे.
21 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन झाल्यावर मध्यरात्री   खंडू सिध्दू नाईक (वय-30) हा जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात दारू पिऊन झोपला होता. त्यावेळी शिंदे याने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. यात तो जागीच गतप्राण झाला. पोलीसांना सांगितलेल्या जबानीत त्याने नाईक आपल्याला गेल्या वर्षभरापासून दारू आणि तंबाकू दे, असे म्हणत वारंवार त्रास देत होता. दारू,तंबाकू दिली नाही तर तुला मारून टाकतो, अशी धमकी देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. गणपती विसर्जनानंतर तो एकटाच शाळेच्या आवारात झोपला होता. ही संधी साधून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.
आरोपी रावसाहेब शिंदे हा खून झाल्यानंतर गावातून गायब झाला होता. पोलीस त्याच्या मागावरच होते. तपास अधिकारी गजानन कांबळे यांना तो आरेवाडी येथे असल्याचे समजल्याने आज सकाळी त्यांनी आरोपीला तिथून ताब्यात घेतले. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment