Tuesday, September 11, 2018

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची मंत्रालयावर धडक

2 ऑक्टोबर रोजी पेन्शनदिंडी; 3 रोजी मंत्रालयाला घेराव
जत,(प्रतिनिधी)-

नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचार्‍यांना 1982 ची जुनीच पेन्शन योजना लागू करावी. अंशदान पेन्शन (डीसीपीएस/एनपीएस) योजना रद्द करावी, या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी महात्मा गांधी जयंतीदिनी पेन्शनदिंडी काढणार असून, 3 ऑक्टोबर रोजी मंत्रालयावर धडक देऊन घेराव घालणार असल्याची माहिती राज्य जुनी पेन्शन हक्‍क संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

या संघटनेच्या नेतृत्वात विविध कर्मचारी संघटना एकवटल्या असून, राज्य सरकारवर दबाव निर्माण केला जात आहे. विशेष बाब म्हणजे, या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेचीही न्यायपीठाने गांभीर्याने दखल घेतली असून, हे प्रकरण पूर्णपीठाकडे सोपविले जावे, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर 31 ऑक्टोबर 2005 पासून 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर राज्य सरकारच्या सेवेत रुजू होणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी नवीन परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस/एनपीएस) अंमलात आणली आहे. ही योजना अंमलात आणताना 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली होती. नवीन योजनेमुळे कर्मचार्‍यांच्या वेतनातूनच 10 टक्के पगारकपात केली जात असून, सेवानिवृत्तीनंतर मिळणारी 50 टक्के पेन्शन बंद झाली आहे. कपात केलेल्या रकमेची 40 टक्के रक्कम सरकार शेअर बाजारात गुंतवणूक करणार असून, त्यावर जे व्याज मिळेल, त्यावर पेन्शन दिली जाणार आहे, जी अत्यल्प असणार आहे. कुटुंब निवृत्ती वेतन योजनाही नसल्यामुळे एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याला शासनाकडून काहीही आर्थिक मदत दिली जाणार नाही. त्यामुळे या डीसीपीएस व एनपीएस योजनेविरोधात सरकारी कर्मचार्‍यांत असंतोषाची लाट निर्माण झाली असून, नोव्हेंबर 2005 नंतर लागलेले जवळपास साडेचार लाख विविध खात्यांचे सरकारी अधिकारी, कर्मचारी आंदोलन करत आहेत. या संदर्भात पेन्शन हक्‍क संघटनांच्यावतीने उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली असून, ती आता पूर्णपीठाकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

याच मागणीसाठी पेन्शन दिंडी व मंत्रालयास घेराव असे आंदोलनदेखील हाती घेण्यात आले असून, महात्मा गांधी जयंतीदिनी, 2 ऑक्टोबर रोजी ठाणे येथून या पेन्शन दिंडीस सुरुवात होणार आहे. ठाणे ते मंत्रालय-आझाद मैदान असे मार्गक्रमण करून ही दिंडी शिवाजी पार्कवर जाणार आहे. दुसर्‍या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे पोहोचणार असून, तेथे सामूहिक उपोषण सुरु केले जाणार आहे. सरकारला भेटण्यासाठी जाणार्‍या शिष्टमंडळाच्या मागण्या मान्य न झाल्यास तेथेच मंत्रालयास घेराव घातला जाणार असल्याची माहिती राज्य जुनी पेन्शन हक्‍क संघटनेच्यावतीने देण्यात आलेली आहे. सामूहिक उपोषण करूनही शासनाने मागणी पूर्ण न केल्यास कोणत्याहीक्षणी राज्य कार्यकारिणीचे सदस्य आमरण उपोषणाचा निर्णय घेतील, असेही सांगण्यात आले.

2 comments: