Tuesday, September 18, 2018

पिकांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी


खरिप हंगाम वाया; रब्बीचीही शाश्वती नाही
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पावसाअभावी खरिप हंगामातील पिके वाया गेली आहेत. जून आणि जुलैच्या रिमझिम पावसावर शेतकर्यांनी पेरण्या केल्या होत्या. पण पुढे पाऊसच झाला नसल्याने पिके सर्व करपून वाया गेली. त्यामुळे शासनाने पाहणी करून सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सध्या जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पन्नासहून अनेक गावांनी टँकरने पाणी पुरवठा करावा,यासाठी मागणी केली आहे. विहिरी,कुपनलिका,तलाव कोरडे पडले आहेत. अशातच खरिप पूर्ण वाया गेला आहे,पण आगामी रब्बी हंगाम तरी हाती येईल की, नाही याची शाश्वती नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गेल्या वर्षीदेखील शेतकर्यांना खरिप हंगामा हाताला लागला नव्हता. शासनाने पावसाअभावी वाळलेल्या खरिप हंगामातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत व शेतकर्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या सात वर्षांपासून पूर्ण क्षमतेने पाऊस पडला नाही. सध्या तलाव,विहिरी, कुपनलिका, हातपंप कोरड्या पडल्या आहेत. खरिप पूर्ण वाया गेला आहे. परतीच्या पावसाने मेहरबानी केली तरच रब्बीच्या पेरण्या होणार आहेत. सध्या जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मेंढपाळ आपली जनावरे घेऊन रानोमाळ भटकत आहेत. काही शेतकरी चार्यासाठी कर्नाटकात वार्या करत आहेत. पाऊस झाला नाही तर भयानक परिस्थिती निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी मोठ्या काळजीत आहे. शेतकरी सातत्याने कर्जाच्या खाईत लोटला जात असून पिके त्याला साथच देत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या तातडीच्या मदतीची गरज असून नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी होत आहे.No comments:

Post a Comment