Saturday, September 8, 2018

चांगली पिढी घडवण्याचे शिक्षकांपुढे आव्हान:स्वामी अमृतानंद महाराज

चांगली पिढी घडवण्याचे शिक्षकांपुढे आव्हान:स्वामी अमृतानंद महाराज

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर

बिळूर:

आज मुलगा आई-वडिलांना विचारेना,व्यसनाधिनता, खून-हाणामार्‍या वाढल्या आहेत.सर्वत्र आराजकता माजली आहे. आजच्या मुलांवर संस्कार घडवण्याची गरज आहे.शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी फक्त गुणांच्या मागे लागलेले आहेत. समाज,देश आदर्श बनवायचा असेल तर पहिल्यांदा चांगली पिढी घडविणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बालगाव (ता. जत) येथील मठाचे स्वामी अमृतानंद महाराज यांनी बोर्गी (ता. जत) येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले.

बोर्गी येथील सहारा कला,क्रीडा,व्यायाम व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र आरळी होते. यावेळी बोलताना अमृतानंद महाराज म्हणाले, सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आशियाई स्पर्धेत फक्त 59 पदके मिळतात. मात्र इंडोनेशियासारखे छोटे देश शतकांवर पदके मिळवतात. आपल्याकडील शिक्षण पद्धती चुकीच्या मार्गाने चालली आहे.अभ्यास आणि गुण यांकडे आपण लक्ष देत आहोत. त्यामुळे खरे संस्कार बाजूला पड्त चालले आहेत. हे असेच चालू राहिले तर देशात आराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे संस्कारशील पिढी घडवण्याची गरज आहे. आणि शिक्षकांपुढे हे मोठे आव्हान आहे.

सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनी जत तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून ती आणखी उंचावण्यासाठी आपले सहकार्य राहील, असे सांगितले. डॉ. रवींद्र आरळी यांनी कोणतेही कार्यक्रम आता पेपरलेस आणि फॉवरलेस व्हायला हवेत. उपस्थितांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबवावा हे सांगतानाच त्यांनी सहारा ग्रुपने शिफारस केलेल्या रुग्णास मोफत उपचार केले जातील, असे सांगितले.

यावेळी संभाजी कोडग, रामराव मोहिते,मच्छिंद्र ऐनापुरे, सिद्धू कोरे,कुमार चौगुले, प्रल्हाद हुवाळे, भाऊसाहेब महानोर आदी 28 शिक्षकांना प्रमाणपत्र, पदकासह आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सहारा ग्रुपचे सचिव आशिफइक्बाल जाहगिरदार यांनी केले. प्रा.घन:शाम चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. आभार राजेंद्र बिराजदार यांनी मानले. जी.के.बिराजदार, अ‍ॅड, आडव्याप्पा घेरडे, अशोक बरडोल, सचिन होर्तीकर, संजय तेली,तम्मणगौडा रवी-पाटील यांनी सहारा ग्रुपला आर्थिक मदत जाहीर केली. गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधने, विनायक शिंदे, चनबसू चौगुले,संभाजी कोडग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.लखन होनमोरे, मलकारी होनमोरे,गांधी चौगुले,लकाप्पा शिरगट्टी, मंडळाचे अध्यक्ष दावल पुळुजकर, उपाध्यक्ष मौलाली सातभाई,खजिनदार मल्लिकार्जून उटगी यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.

 
फोटो ओळ(बोर्गी ता.जत येथील सहारा कला,क्रीडा,व्यायाम व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने जत तालुक्यातील 28 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्वामी अमृतानंद महाराज,जि.प.शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील,डॉ.रवींद्र आरळी,गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने आदी उपस्थित होते.)

No comments:

Post a Comment