Thursday, September 13, 2018

जतमधील कोळी कुटुंबावरील बहिष्कार अखेर उठविला


जत,(प्रतिनिधी)-
 समाजाने बहिष्कृत केल्याने 40 वर्षे एकटेपणाच्या अवस्थेत आयुष्य कंठणार्या मारुती कोळी (रा. जत) यांच्या कुटुंबाला त्यांच्या मरिआई समाजाने अखेर समाजात घेतले. अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि भटक्या समाज संघटनेच्या प्रयत्नामुळे जत पोलिसांनी जातपंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा दाखवला. त्यानंतर पंचांनी नरमाईची भूमिका घेत पानसुपारी देऊन मारुती कोळी यांना समाजात सामावून घेतले. यावेळी कोळी कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
महादेव कोळी जमातीत असणारे आणि मरिआई समाज म्हणून चालीरीतीप्रमाणे मारुती कोळी यांचे कुटुंब गुण्यागोविंदाने जगत होते. परंतु त्यांनी लग्न करताना जातपंचायतीला विश्वासात घेतले नाही, लग्नापूर्वी पंचायतीला द्यावी लागणारी बिदागी दिली नाही. म्हणून कोळींच्या कुटुंबाला बहिष्कृत केले होते. त्यांना सुनावलेला एक लाख रुपयांचा दंड भरल्यानंतरही त्यांना समाजात घेतले जात नव्हते. आणखी दोन लाखांचा दंड मागितला जात होता. डोक्यावर मरिआईचा गाडा घेऊन रानोमाळ हिंडताना दारोदारी जाऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार्या कोळींना दोन लाखांची रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे ते बहिष्कृताचे जिणे जगत होते.
 वयाची पंचविशी ओलांडून जाणार्या दोन मुलींची लग्न जमवली जात असतानाही जातपंचायत आडवी येऊ लागल्यानंतर अर्धांगवायूचे जगणे वाट्याला आलेल्या मारुती कोळी यांनी जत पोलिसांचे दार ठोठावले. परंतु पोलिसांनी फारसे मनावर घेतले नाही. मग त्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि भटक्या विमुक्ती जाती -जमाती हक्क परिषदेकडे अंनिसने कोळी पती-पत्नीला सोबत घेऊन त्यांची कैफियत जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासमोर मांडली. त्यांनी तात्काळ या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश जत पोलिसांना दिले आणि कोळी यांचे गेल्या चाळीस वर्षांचे बहिष्कृत जिणे संपुष्टात आले.
जत ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तासीलदार यांनी जातपंचांना बोलावून घेऊन त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मग पंचांनी नरमाईची भूमिका घेऊन मारुती कोळी यांच्या कुटुंबावरील बहिष्कार उठवला. दोन्ही मुलींची लग्ने समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडण्याची जबाबदारीही पंचांनी घेतली. तसे पंचांनी लेखी दिले. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी हक्क परिषदेचे विकास मोरे, गणेश निकम, नितीन मोरे, अतुल कांबळे, दयानंद मोरे, हवालदार विजय वीर, अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, कार्यवाह राहुल थोरात यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment