Sunday, October 21, 2018

जत तहसीलला 11 गावे जोडण्याची सरपंचांची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
नव्याने झालेल्या संख अप्पर तहसील कार्यालयाकडे समावेश करण्यात आलेल्या 11 गावांनी त्यांची गैरसोय होत असल्याने पुन्हा जत तहसीलला जोडण्याची मागणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुचंडीचे सरपंच अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुणीकोणूर, मायथळ, सनमडी, घोलेश्वर, काराजनगी, वळसंग, सालेकिरी, शेड्याळ, रावळगुंडवाडी व उंटवाडी या गावातल्या सरपंचांनी महसूलमंत्री श्री. पाटील यांची जत येथे भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, 11 गावे जी संख अप्पर तहसील कार्यालयाकडे जोडली आहेत, ती गावे अगदी जतजवळ आहेत. पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर जत हे तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र संख या गावांपासून 30 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय लोकांना संख येथे जाऊन यायला वेळेत एसटी बसची सोय नाही. या ठिकाणी जाऊन यायला लोकांना एक दिवस पुरत नाही.
जत तहसील कार्यालय या गावांना जवळ असल्याने आणि तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील कार्यालयाकडे कामासाठी आलेल्या लोकांना आणखी बाजारहाट करता येतो. संख येथे अशी कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे ही 11 गावे पुन्हा जत तहसील कार्यालयाकडे जोडण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment