Thursday, October 18, 2018

116 अंगणवाड्या भरतात अजूनही मंदिरात, झाडांखाली!


जत,(प्रतिनिधी)-
शासनाच्या उदासिन धोरणामुळे आजही जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यातल्या चिमुकल्या बालकांना समाज मंदिर, देऊळ, झाडाखाली, प्राथमिक शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. जत तालुक्यातल्या 116 अंगणवाड्यांना अद्याप इमारत नाही. सांगली जिल्ह्यात हीच संख्या 765 आहे.
मुलांना शाळेची सवय लागावी तसेच त्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न मिटावा, यासाठी 3 वर्षांपासून लहान मुले अंगणवाडीत दाखल होतात. मात्र त्यांना पुरेशा भौतिक सुविधा आणि खेळासाठी साहित्य उपलब्ध झाले तरच ते अंगणवाडीमध्ये रममाण होणार आहेत. अन्यथा अंगणवाडीचा त्यांना कसलाच फायदा होणार नाही. आता अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी शासनाने 6 लाखावरून 8 लाख 50 हजार रुपयांची तरतूद केली आहे,पण शासन भरीव निधी जोपर्यंत उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत इमारती उपलब्ध कशा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
महागाई वाढल्याने आणि त्यात जीएसटीची भर पडली असल्याने इमारत बांधकामासाठी 6 लाख रुपये पुरेसे होत नव्हते. परवा शासनाने यात भर घातली आहे. 6 लाखांऐवजी 8 लाख 50 हजार तर 6 लाख 60 हजाराऐवजी 9 लाख 40 हजार रुपयांची तरतूद केली आहे. सांगली जिल्ह्यात 2 हजार 484 अंगणवाड्या तर 446 मिनी अंगणवाड्या आहेत. यांपैकी 473 अंगणवाड्या आणि 292 मिनी अंगणवाड्यांना अद्याप स्वतंत्र इमारत नाही. या अंगणवाड्या समाजमंदिर, देऊळ, प्राथमिक शाळा, खासगी जागेत किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतींमध्ये सुरू आहेत. इमारत बांधकामासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव जाणे गरजेचे आहे. शिवाय त्याप्रमाणात निधी उपलब्ध व्हायला हवा.
अंगणवाडी इमारत बांधकामासाठी जिल्ह्यातून 130 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. यासाठी 11 कोटी 5 लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र डीपीसी कडून नवीन बांधकामासाठी 75 लाख व दुरुस्तीसाठी 75 लाख रुपये एवढीच तरतूद करण्यात आली आहे. शिवाय काही अंगणवाड्यांना जागाच उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.No comments:

Post a Comment