Wednesday, October 17, 2018

14 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर, रुबेलावर नियंत्रणासाठी लसीकरणजत,(प्रतिनिधी)-
 गोवर हा घातक आणि विषाणूजन्य आजार आहे. रुबेलाही विषाणूजन्य आजार असल्याचे स्पष्ट झाले. गोवर व रूबेला रोगांवर नियंत्रण व त्यांचे उच्चाटन करण्यासाठी सांगली जिल्ह्यात 14 नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेव्दारे 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शाळा, पालकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
जगात रुबेला आणि गोवरमुळे होणार्या मृत्यूमध्ये भारतात 36 टक्के प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले. गोवर या आजारामुळे दरवर्षी भारतात 49 हजार 200 मुले मृत्युमुखी पडतात. त्याच्यावर मात करण्यासाठी गोवर व रूबेला लसीकरण मोहीम राबवली जाईल. गोवर व रूबेला लसीकरण मोहीम आतापर्यंत एकवीस राज्यात यशस्वीपणे राबवली आहे. ही मोहीम राबवणारे महाराष्ट्र 22 वे राज्य आहे, बाल वयात होणारे रोग टाळण्याच्या सर्वात प्रभावी मार्गापैकी लसीकरण आहे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाल्याने लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकणार्या रोगांना थोपवणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले आहे.
सन 2020 पर्यंत लसीकरणाद्वारे गोवर रोगाचे उच्चाटन आणि रूबेला रोगावर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्टआहे. यामध्ये 9 महिने ते 15 वर्षे वयातील सर्वांना एकाच लसीद्वारे गोवर व रूबेला या दोन्ही रोगांवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यात 6 लाख 83 हजार 877 बालक लाभार्थी प्रशासनाला अपेक्षित आहेत. यामध्ये ग्रामीण भागात 5 लाख 10 हजार 952, शहरी भागात 47 हजार 487 आणि महानगरपालिका क्षेत्रात 1 लाख 25 हजार 438 लाभार्थी आहेत. 2 हजार 905 शाळा, 2 हजार 981 अंगणवाड्या आणि 13 हजार 151 नियमित आरोग्य सेवा सत्रांची ठिकाणे निवडली आहेत.
आरोग्य विभागाबरोबरच शिक्षण, महिला व बालकल्याण, गृह, अल्पसंख्याक विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब यासारख्या स्वयंसेवी संस्था यांनीही परस्पर समन्वय घेऊन ही मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जानेवारी 2019 अखेर शंभर टक्के लसीकरण करण्यात येईल. लसीचे गंभीर दुष्परिणाम नाहीत, मात्र त्रास होत असेल प्रत्येक शाळेत वैद्यकीय अधिकार्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे. एकाच लसीव्दारे बालकांमधील दोन आजारांचे प्रमाण कमी होवून बालक व त्यांचे भविष्य सुरक्षित राहणार असून पालकांनीही लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जागोजागी केले जात आहे.

No comments:

Post a Comment