Monday, October 22, 2018

1 तारखेला पगार करा,अन्यथा अधिकार्‍यांचे पगार रोखणार


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांचे पगार वेळेत होण्यासाठी ऑनलाईन माहिती संबंधित विभागप्रमुखांनी वेळेत वित्त विभागाकडे पाठवणे आवश्यक आहे. मात्र ही माहिती वेळेत येत नसल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगार होत नाहीत. तोंडावर दिवाळी सण आहे. त्यामुळे 1 तारखेला पगार करण्यासाठी ऑनलाईन माहिती भरत नाहीत, तोपर्यंत अधिकार्यांचे पगार थांबविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार काढण्यासाठी काही लोक बेकायदेशीरपणे वर्गणी रक्कम गोळा करीत आहेत. अशा लोकांवर देखील तात्काळ पुरावे गोळा करून, कडक कारवाई करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
 सांगली जिल्हा परिषदेकडे शिक्षकांसह विविध प्रवर्गाचे सुमारे साडेनऊ हजार कर्मचारी आहेत. यामध्ये पूर्वी पगार पत्रके येत होती, त्यावेळी महिन्याच्या एक ताखरेला पगार होत असे. मात्र ऑनलाईन पध्दत सुरू झाल्यापासून पगार माहिती ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी संबंधित विभागाकडून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाला पाठविण्यासाठी विलंब केला जातो. कर्मचार्यांचे पगार महिन्याच्या एक तारखेला करावेत, यासाठीची मागणी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शिक्षक संघटनांसह विविध कर्मचारी संघटना जिल्हा परिषदेकडे करीत आहेत. मात्र ऑनलाईन माहितीच विलंबाने येत असल्यामुळे वित्त विभाग देखील यापुढे हतबल ठरला आहे. विलंबाने पगार होत असल्यामुळे कर्मचार्यांचे विविध बँकांचे हप्ते; तसेच मासिक खर्चाचे नियोजनदेखील कोलमडून जाते; शिवाय हप्ते चुकल्यामुळे बँकांकडून बसणारा आर्थिक भुर्दंड वेगळा. त्यामुळे महिन्याच्या एक तारखेलाच पगार करण्याची मागणी होती. यावर, पुढील महिन्यात पहिल्याच आठवड्यात दिवाळी सण आलेला आहे, जर कमर् चार्यांना एक तारखेला पगार मिळाला नाही, तर दिवाळी साजरी करताना अडचणी येणार आहेत. लवकरच शासानकडून देखील याबाबतचे निर्देश येणार आहेत. त्यामुळे एक तारखेला कर्मचार्यांचे पगार करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी वेळेत ऑनलाईन माहिती द्यावी, तोपर्यंत माझ्यासह सर्व अधिकार्यांचे पगारच थांबवा, अशा सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी मुख्य वित्त व लेखाधिकारी डॉ.राजेंद्र गाडेकर यांना दिले आहेत. शिक्षकांचे पगार काढण्यासाठी बेकायदेशीरपणे कोणतीही वर्गणी काढता येणार नाही, अशा प्रकारे कोण वर्गणी गोळा करताना आढळल्यास त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment