Saturday, October 13, 2018

201 तालुके दुष्काळाच्या छायेत

जत,(प्रतिनिधी)-
तब्बल चार महिनाभरापासून बेपत्ता असलेला पाऊस, पिकांची गंभीर स्थिती तथा त्यावर झालेला किडीचा प्रादूर्भाव आदी कारणांमुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. राज्यातील अशा २0१ तालुक्यांची पाहणी करून त्या तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असून लवकरच तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. अखेरच्या क्षणी पावसाने दगा दिल्याने संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत आले आहे.
या खरीप हंगामात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जून ते ५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरी ११४२.२ मि.मी. पाऊस झाला असून त्याची सरासरी ७६.८ इतकी आहे. त्यामुळे सरासरी २३.२ मि.मी. पावसाची तुट निर्माण झाल्याने अनेक तालुक्यांमधील पिके धोक्यात आली आहेत.
भंडारा जिल्ह्यासह ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याध्मध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस बरसला आहे. नाशिक, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ५0 ते ७५ टक्के पाऊस कोसळला असून रत्नागिरी व सातारा जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र, २५ ते ५0 टक्केपर्यंत पाऊस झाला आहे.
 विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तथा गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. सध्या धान फुलोर्‍यावर असून, काही ठिकाणचे धान कापणीवर आले आहे. परंतु, पावसाअभावी पिकांच्या पुढील वाढीवर परिणाम होणार आहे. याशिवाय निळे भुंगेरे, पिवळा खोडकिडा या किडीचा तर करपा व कडाकरपा या रोगांचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. सोयाबीन पिकावर उंट उळी, चक्र ी भुंगा व खोडमाशी या किडीचा प्रादूर्भाव आढळून आल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राज्यातील सर्वच विभागात यावर्षी किड व रोगांचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. कोकण विभागातील भात पिकावर खोडकिडा, निळे भुंगेरे, नाशिक विभागात ज्वारी पिकावर मावा, खोडकिडा व पाने खाणार्‍या अळीचा, तूर पिकावर रस शोषणार्‍या किडीचा तर सोयाबीन पिकावर पाने खाणार्‍या अळीचा, कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झालेला आहे. पुणे, कोल्हापूर, लातूर, अमरावती विभागात सारखीच स्थिती निर्माण झालेली असल्याने दुष्काळाचे चटके सोसावे लागणार आहेत.
ज्या २0१ तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळाची प्रथम कळ लागू केली आहे त्या तालुक्यांमध्ये मागील २१ दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे या तालुक्यांमध्ये तातडीच्या उपाययोजना राज्य सरकारकडून केल्या जाणार आहेत.

No comments:

Post a Comment