Wednesday, October 3, 2018

जतच्या प्राथमिक शाळा 2020 पर्यंत डिझीटल करण्याचा संकल्प


'युथ फॉर जत' चे होतेय कौतुक
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातला जत तालुका दुष्काळाने पिचलेला आहे. इथे रस्ते,वीज, पाणी या जगण्याच्या मूलभूत सोयी मिळवण्यासाठी स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनंतरही संघर्ष करावा लागत आहे. शैक्षणिक समस्यांचा पाढा तर न वाचलेलाच बरा. आज शिक्षणाशिवाय त्यातही उच्च तंत्रज्ञान महत्त्वाचे झाले आहे. याशिवाय प्रगती अशक्य आहे. तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांना याचे बाळकडू मिळत गेले तर त्याचा लाभ त्यांना पुढे होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जतच्या काही उच्चशिक्षित मंडळींनी सामाजिक बांधिलकीतून युथ फॉर यू या संस्थेच्या माध्यमातून जत तालुक्यातल्या सर्व प्राथमिक शाळा दोन वर्षात डिझीटल करण्याचा संकल्प सोडला आहे.

नुकतेच या संस्थेने जत तालुक्यातल्या कुलालवाडी, अचकनहळ्ळी, बागेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळांना आणि येळवी हायस्कूल (येळवी), येळवी आश्रमशाळा आणि बनाळीतील श्री श्री विद्यामंदिर अशा सहा शाळांना डिझीटल शिक्षणाला अनुसरून सॉफ्टवेअर पुरवले आहेत. 2020 पर्यंत डिझीटल 425 ही मोहीमच उघडली आहे. या तंत्रज्ञानामुळे शिक्षकांना अध्यापन करण्यास आणि विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यास सोपे होत आहे. आजच्या मोबाईलच्या जमान्यात या तंत्रज्ञानाची नितांत निकड आहे. यातून जत तालुक्यातल्या शाळा डिझीटल होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून युथ फॉर यू ही संस्था स्वत:ची 30 टक्के रक्कम गुंतवणार आहे आणि उर्वरित 70 टक्के रक्कम शिक्षक,पालक, शिक्षण संस्थांचे संचालक मंडळ आणि उदार देणगीदार यांच्या माध्यमातून उभे केले जाणार आहेत.
  युथ फॉर जत ही  सामाजिक संस्था आहे याची उभारणी जुलै 2016 मध्ये करण्यात आली आहे. या नोंदणीकृत संस्थेची  नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 अंतर्गत झाली असल्याने देणगीदारांना आपली देणगी या संस्थेस उदारपणे देता येणार आहे. या संस्थेशी निगडीत असलेले सर्व तरुण उच्च शिक्षित असून देशात-परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. स्वत:सह दुसर्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा या संस्थेचा प्रयत्न आहे. समाजातील सर्वच घटकांना सामावून जत तालुक्यातील परिस्थिती सकारात्मक करण्यासाठीचे पाऊल या संस्थेने उचलेले आहे.
या संस्थेमध्ये अजय पवार,शैपून शेख,डॉ. गजानन रेपाळ, डॉ. सुनील जोशी,सतीश तंगडी, अमित बामणे, सचिन जाधव, ॅड. राजकुमार म्हमाणे आदी मंडळी कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment