Tuesday, October 9, 2018

जत शहरातल्या हाय वेचे काम कधी सुरू होणार?


जत,(प्रतिनिधी)-
गुहागर-विजापूर हाय वे जत शहरातून गेला असून सध्या या मार्गाच्या विस्तारणीकरणाचे काम सुरू आहे. नागज ते जत असा रस्ता पूर्ण होत आला आहे. मात्र कंत्राटदाराने जत शहरातला रस्ता वगळून नगारटेकापासून पुढच्या विजापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शहरात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात धुरळ्याचा लोट नागरिकांच्या नाकातोंडात जात असल्याने नागरिकांना वारंवार दवाखान्याची पायरी चढावी लागत आहे. जत शहरातून गेलेल्या रस्त्याचे काम पहिल्यांदा सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

गुहागर-विजापूर या मार्गावर मोठी वर्दळ आहे. मोठी आणि जड वाहने या मार्गावरून जात असल्याने सांगोलकर चौक ते बसवेशवर चौक या सुमारे एक किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. शिवाय लोकांना मणक्याचे आजार बळावत आहेत. हा एक किलोमीटरचा रस्ता ओलांडायला अतिक्रमण, खड्ड्यांमुळे सुमारे अर्धा तास वेळ घालवावा लागत आहे. गटारीचे पाणी रस्त्यावर येत असून त्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यातच पाऊस नसल्याने रस्त्यावरची माती आता नागरिकांच्या नाकातोंडात जाऊ लागली आहे.याचा फटका त्यांच्या आरोग्यावर बसत असून सर्दी, खोकला, शिंका, डोकेदुखी असे आजार बळावत चालले आहे.
या मार्गावरून हजारो वाहने नेहमी ये-जा करत असून लोकप्रतिनिधींनादेखील याच मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. तरीही लोकप्रतिनिधी गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. नागज ते जतपर्यंतच्या रस्त्याचे काम होत आले आहे. मात्र कंत्राटदाराने शहरातल्या रस्त्याचे काम बंद ठेवून नगारटेकापासून पुढे काम सुरू केले आहे, त्यामुळे शहरातल्या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार आणि धुरळा व खड्ड्यांपासून लोकांची कधी सुटका होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post a Comment