Monday, October 22, 2018

रामपूर गटातील जिल्हा परिषदेच्या शाळांची 'तंबाकूमुक्त' विषयी कार्यशाळा


जत,(प्रतिनिधी)-
रामपूर (ता. जत) व या गावाखालील वस्तीशाळांची तंबाकूमुक्त शाळा या विषयावर नुकतीच रामपूर येथे कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रामपूर गटातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा तंबाकुमुक्त करण्याचा निर्णय या कार्यशाळेत घेण्यात आला.
या कार्यशाळेच्या माध्यमातून पालक, विद्यार्थ्यांमध्ये तंबाकू सेवनाने होणारे दुष्परिणाम विशद करण्यात आले. कंठी आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका सौ. करे यांनी याबाबत उपस्थितांना विस्तृत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आज सर्वाधिक कॅन्सरचे प्रमाण युवापिढीमध्ये आढळून येत असून देशाच्या भविष्याचे नागरिक या तंबाकू, मावा, गुटखाच्या सेवनाने स्वत:ला संपवून टाकत आहे. या देशाची प्रगती ज्यांच्या हातात आहे,त्यांचीच अशी दुर्दशा होत असेल तर हा देश प्रगती कसा साधणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रारंभी माळीवाडीचे मुख्याध्यापक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी माळीवाडी शाळा तंबाकूमुक्त झाली आहे. रामपूर गटातील सर्वच शाळांनी शंभर टक्के तंबाकूमुक्त शाळा करून एक नवा आदर्श घालून देऊ या, असे आवाहन केले. यावेळी कोळेकरवाडीचे मुख्याध्यापक आगतराव पवार, रामपूर शाळेचे मुख्याध्यापिका गुणाबाई पोळ, तुराईवस्तीचे मुख्याध्यापक विद्याधर गायकवाड, घाटगेवाडीचे मुख्याध्यापक उत्तम चाबरे, श्रीमती अलका थोरात, सौ. कुलकर्णी,श्री.कोरे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार श्रीमती उषा मिरजकर यांनी मानले.
No comments:

Post a Comment