Tuesday, October 9, 2018

जत येथे शुक्रवारी आमसभा


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याची आमसभा शुक्रवारी 12 ऑक्टोबर रोजी येथील साई प्रकाश मंगल कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. पंचायत समितीसह सर्व विभागाकडून  या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या आमसभेत सत्ताधारी भाजप व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना, रिपाइं, बसव सेना आदी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असून याठिकाणी दुष्काळासह विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.
या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार विलासराव जगताप असणार आहेत. आमसभेमध्ये यामध्ये सार्वजनिक बांधकाम, महावितरण कंपनी कार्यालय जत व संख, म्हैसाळ योजनेच्या सर्व कार्यालय,उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, वनक्षेत्रपाल, लागवड अधिकारी, ग्रामीण रुग्णालय जत व माडग्याळ, अभिलेख कार्यालय जत या कार्यालयाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या प्रमुखांना तयारी करून यावे लागणार आहे. जत येथे आमदार विलासराव जगताप यांनी आठ दिवसांपूर्वी जत पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील रोजगार हमी कामाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली होती. या आढावा बैठकीत काँग्रेस पक्षाचे नेते विक्रम सावंत व त्यांच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहून या बैठकीत चर्चा केली होती. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वाद झाला होता. यावेळी प्रशासनाला पोलीस बंदोबस्त घेऊन ही बैठक पार पडावे लागले होते. त्यामुळे शुक्रवारी होणार्या आमसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहून आपली विविध प्रश्नांवरची आक्रमकता स्पष्ट करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 या बैठकीत प्रामुख्याने महावितरण कंपनी, म्हैसाळ योजना, महसूल विभाग, कृषी विभाग, रोजगार हमी योजना या कार्यालयाची चर्चा होण्याची शक्यता असून या कार्यालयातील प्रमुख अधिकार्यांना अभ्यास करून या बैठकीस उपस्थित राहावे लागणार आहे. या बैठकीस कर्मचारी व अधिकारी शंभर टक्के उपस्थित राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. आम सभेसाठी जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे गेली चार दिवसांपासून तयारी करीत आहेत.

No comments:

Post a Comment