Friday, October 5, 2018

जतेत वृध्देचे सोने लुटणार्‍या महिलेस अखेर अटक


जत,(प्रतिनिधी)-
 वृध्द महिलेच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तिच्याच घरात जाऊन गळा आवळून गुरुवारी भरदुपारी सोळा तोळे लुटणार्या संशयित महिला आरोपीस अखेर पोलिसांनी अटक केली. संशयित गीता सिध्दाम शेगावी (वय 35, मूळ गाव पाच्छापूर ता. जत) ती सध्या बस स्थानकामागे राहते. तिला जत न्यायालयाने नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली ररहश.
 पोलिसांनी 24 तासांत या घटनेचा छडा लावला जत शहरातील घाटगेवाडी रस्त्यावर एकट्याच राहणार्या वृध्द महिलेचा गुरुवारी गळा आवळून जखमी करून तिच्या अंगावरील तब्बल सोळा तोळे सोने घेऊन या संशयित महिलेने पोबारा केला होता. यलव्वा गोपीनाथ वाघमारे या महिलेशी दवाखान्यात झालेल्या ओळखीचा गैरफायदा या संशयित महिलेने घेतला होता. घर विकत घेण्याच्या बहाण्याने वाघमारे यांच्या घरी जाऊन संशयित आरोपी गीता शेगावी हिने यलव्वा वाघमारे हिचा गळा आवळून बेशुध्द केले. त्यानंतर अंगावरील सोळा तोळे सोने घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी जत पोलिसांत याबाबतचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली डॉ. आरळी यांच्या हॉस्पिटल मध्ये असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता व मोबाईल नंबर लोकेशन शोधले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दहा वाजता गीता शेगावीस अटक केली.सुरवातीस यलव्वा वाघमारे या महिलेस गीताने आपले नाव लीलावती ऐनापुरे असे खोटे सांगितले होते, ते तपासाअंती सिध्द झाले. तिने या गुन्ह्याची कबुली दिली आहे . या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गाढवे करीत आहेत.

No comments:

Post a Comment