Sunday, October 21, 2018

नवर्‍याला सुपारी देऊन संपवले


पाच लाखांची सुपारी; अनैतिक संबंधास अडथळा
जत,(प्रतिनिधी)-
अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या आपल्याच नवर्याला पाच लाखांची सुपारी देऊन मारू टाकल्याची घटना सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यात घडली आहे. नवर्याचे मारेकरी कवठेमहांकाळ (जि. सांगली) जिल्ह्यातील असून त्यांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात उघड झालेल्या या घटनेने सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सांगोला तालुक्यातील विलास शेटे याच्या पत्नीचे तायाप्पा सरगर याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधास विलास हा अडसर ठरत होता. त्यामुळे त्याचा कायमचाच काटा काढण्याचे या दोघांनी ठरवले. यानुसार त्यांनी पप्पू करचे यास पाच लाखांची सुपारी दिली. करचे याने कवठेमहांकाळ येथील महेंद्र ऊर्फ महेश माने (वय 29) आणि तगदीर कांबळे (वय 23) या दोघांसह अमर आटपाडकर यांची मदत घेऊन विलास शेटे याच्यावर पाळत ठेवली.
या तिघांनी 5 ऑगस्ट 2018 रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास विलास शेटे हा दुचाकीवरून जात असताना पाळत ठेवून पंढरपूर- सांगोला या मार्गावर पाठलाग सुरू केला. बुद्धीहाळ गावाजवळ आल्यावर विलास शेटेवर पाठीमागून स्टीकने वार करून खाली पाडले. महेंद्र ऊर्फ महेश कांबळे याने डोक्यात दगड घातला. त्याचबरोबर मागून फियाट लिनिया (एमएच 12 एफयू 3789) या पांढर्या रंगाच्या चारचाकी गाडीतून आलेल्या अमर आटपाडकर आणि तगदीर कांबळे यांनी त्याच्या अंगावर गाडी घातली. आणि त्याला ठार केले. ही घटना अपघात असल्याचे भासवण्यासाठी त्याची दुचाकी त्याच्याच अंगावर टाकून सर्वजण पसार झाले. मात्र पोलिस तपासात काही धागेदोरे सापडल्यानंतर पहिल्यांदा अमर आटपाडकर यास कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली. आणि नंतर या खुनाचा उलघडा झाला.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, नाईक आनंदा जाधव, प्रमोद रोडे, महेश नरुटे यांच्या पथकाने सापळा रचून महेश माने आणि तगदीर कांबळे यांना नांगोळे फाटा येथे अटक केली. अधिक तपासासाठी गुन्हा सांगोला पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
No comments:

Post a Comment