Sunday, October 21, 2018

पोलिसांचे समाजासाठीचे योगदान


जत,(प्रतिनिधी)-
देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मरण दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रहितासाठी सेवा बजावताना जीवाची पर्वा न करता बलिदान देणार्या पोलिस बांधवांच्या कार्याची आणि त्यांच्या कार्याची दखल आजच्या नागरिकांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या कार्यालाही सलाम करून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे आहे. कायदा व सुव्यवस्था आबाधित राखताना या पोलिसांना अनेक समस्यांना, अडचणींना तोंड द्यावे लागते. आपण त्यांचीही एक बाजू समजावून घेतली पाहिजे.
सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन शांततामय राहावे, त्यांना सर्व व्यवहार निर्भयपणे करता यावेत. यादृष्टीने पोलीस प्रशासनाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.आजच्या आधुनिक काळातही पोलिसांचे स्थान एक वेगळे महत्त्व व उपयुक्तता राखून आहे. पोलिसांचे समाजाशी असणारे संबंध हे सलोख्याचे असणे आवश्यक आहे. मात्र सध्या हे संबंध फारसे चांगले नसल्याचेच वास्तव पुढे येते. पोलिसांविषयी गुन्हेगारांना धाक तर नागरिकांना आदर असणे अपेक्षित आहे. त्यासाठी पोलिसांच्या भूमिकेत बदल तर समाजाचा दृष्टिकोनही बदलायला हवा. विशेष म्हणजे पोलिसांचे नाव बदनाम करणार्या प्रामुख्याने दारु, जुगार, वाहतूक संदर्भात पोलिसांची भूमिका पारदर्शक हवी. तरचं समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक होईल.
पोलीस अन् समाज अडचणीच्या वेळी आपणास मदत पुरविणारी व्यक्ती ही पोलीस असते.
या नजरेतूनही त्यांचा कार्याचा आढावा घेतला जाणे आवश्यक आहे. पोलीस स्मरण दिन साजरा होत असताना पोलिसांच्या समाजासाठीच्या योगदानाची दखल घेणे गरजेचे आहे. कोणत्याही आपत्तीजनक घटनेवेळी पोलीस दलाचे योगदान अग्रभागी असते. याचीही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्याचवेळी जनतेसाठी राबत असताना जनताच आपल्यावर नाराज का असते? या मुद्द्यावरुन पोलीस प्रशासनानेही विचार केल्यास पोलीस व ंसमाज यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण होऊन सामाजिक शांततेसाठी त्याचा उपयोग होईल.
ब्रिटिशकाळापासून पोलीस प्रशासनाचा विचार केला तर, पोलीस आणि समाज यांच्यात फारसे सौख्य आढळून येत नाही.त्याकाळी पोलीस प्रशासनातील अधिकारी हे प्रामुख्याने ब्रिटिश असत. साहजिकच त्यांच्या वर्तनाचा येथील बहुतांशी समाजाला त्रास होत असे. परिणामी पोलिसांबद्दल समाजात भीती निर्माण होऊन त्यांच्याबद्दल द्वेष पसरला होता.
स्वातंत्र्योत्तर काळातही पोलिसांविषयी समाजमनात निर्माण झालेली प्रतिमा बदलण्यात अपेक्षित यश आले नसल्याचेच दिसत आहे. त्यातच बहुतांशी चित्रपटांमधूनही पोलिसांचे नकारात्मक चित्र समाजासमोर मांडले गेल्याने पोलिसांची समाजमनात
प्रतिमा अधिक गडद झाली. मात्र समाज शांततेतील पोलीस हाच प्रमुख भाग असल्याचे सत्य नाकारता येणारे नाही. पोलीस आणि समाज यांच्यात सातत्याने संबंध येत असून पोलिसांनी त्यांच्या पारंपरिक भूमिकेत बदल करण्यासह सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांकडे माणूस या भूमिकेने पाहाण्याची गरज आहे.
पोलिसांमुळेच समाजातील शांतता अबाधित राखता येणार हे वास्तव आहे. त्यातच पोलिसांविषयी सातत्याने नकारात्मक नजरेने पाहणे टाळण्याची आवश्यकता आहे. पोलीस हे रात्रंदिवस सेवा बजाविताना कशाप्रकारे योगदान देतात, कोणत्या अडचणींचा सामना करतात, समाज म्हणून आपण त्यांच्याशी कसे वागतो? या बाबींचाही विचार झाला पाहिजे. पुरेशी, साधनसामग्री जवळ नसतानाही ते मदत पुरविण्याला प्राधान्य देतात.चोरी, अपघात वा कोणत्याही वेळी घडणार्या अप्रिय घटनांवेळी पोलीस घटनास्थळी हजर होऊन सेवा देतात.
पोलिसांच्या समस्या
समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे, जीवित व वित्त साधनांचे संरक्षण करणे, संभाव्य गुन्हे रोखणे, घडलेल्या गुन्ह्यांचा शोध लावणे, अवैध व्यवसायांना रोखणे यासारखी सामाजिक शांततेसाठी आवश्यक कर्तव्ये पार पाडणारे पोलीस विविध समस्यात अडकलेले आहेत. जनतेचे जीवनमान सुरळीत राहाण्यासाठी म्हणून कार्य असणार्या पोलिसांबद्दल जनतेच्याच मनात रोष असणे, सणासारख्य वेळीही सुट्ट्या नसणे, कामामुळे वाढणारे आजारपण व बिघडणारी मानसिकता, निवासस्थानाच्या अडचणी, महिला पोलिसांच्या विविध अडचणी, पोलिसांना होणारी दमदाटी व मारहाणीचे प्रकार यासारख्या पोलीस बांधवांच्या समस्यांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. (पोलीस स्मरण दिन विशेष
)
No comments:

Post a Comment