Wednesday, October 10, 2018

मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?


जिल्ह्याला मंत्रिपदाची आस; नाईक, जगताप, खाडे की गाडगीळ?
जत,(प्रतिनिधी)-
शनिवारी दि. 13 रोजी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी होणार असल्याचे बोलले जात असून यावेळी सांगली जिल्ह्यातील कोणत्या आमदाराची वर्णी लगेल, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जिल्ह्यात चार आमदार भाजपाचे असून एक आमदार शिवसेनेचा आहे. आमदार सुरेश खाडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक आणि सुधीर गाडगीळ यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनादेखील आमदार अनिल बाबर यांच्याविषयी काय निर्णय घेणार आहे, याचीही जिल्ह्यातल्या सेना कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.

परवा खासदार संजय पाटील यांनी सुरेश खाडे यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता लागलीच जतचे आमदार विलासराव जगताप आणि आणखी 25 जणांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले व जतला मंत्रिपद देण्याची मागणी केली. त्यामुळे मंत्रिपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, याचा थांगपत्ता कुणालाच लागलेला नाही. मात्र सांगली जिल्ह्याला यंदा नक्की मंत्रिपद असल्याचे सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.
भाजपाला महाराष्ट्रात सत्तेवर येऊन चार वर्षे उलटली आहेत. मात्र एवढ्या कालावधीत जिल्ह्यात चार आमदार असताना एकही मंत्रिपद दिले नाही. खासदार संजय पाटील यांना अलिकडेच कृष्णा खोरेचे उपाध्यक्षपद आणि कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. स्वाभिमानी पक्षाच्या सदाभाऊ खोत यांना आपल्या पक्षात सामावून घेत त्यांना राज्यमंत्री केले आहे. परंतु, मुख्य प्रवाहातील आमदार मात्र यापासून वंचित राहिले आहेत. गेल्या चार वर्षात सातत्याने जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होत होती. पण प्रत्यक्षात हाती काहीच लागले नाही. आता शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होत असल्याचे बोलले जात असून या खेपेला नक्की मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
पण नेमकी ही मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे अजून गुलदस्त्यात आहे. ज्येष्ठ आमदार शिवाजीराव नाईक, तीन वेळा आमदार झालेले मिरजेचे आमदार सुरेश खाडे आणि गाडगीळ यांच्या नावाची चर्चा होत असतानाच आता पहिल्यांदाच जतचे आमदार विलासराव जगताप यांच्या नावाची चर्चा जाहीरपणे होऊ लागली आहे. विशेष म्हणजे खासदार पाटील यांनी स्वत: श्री. जगताप यांची शिफारस केली आहे.त्यामुळे नेमके काय घडणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. खानापूर- आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांना शिवसेनेने हिरवा कंदिल दिला तर कदाचित भाजपाचे मंत्रिपद मागे घेतले जाईल, याचीही चर्चा होत आहे. नाईक, खाडे आणि जगताप यांच्या स्पर्धेत कदाचित सुधीर गाडगीळ यांना लॉटरी लागेल का, असाही तर्क लढविला जात आहे. मात्र गेल्या आठ दिवसात पुन्हा एकदा मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. आता ती शेवटची असावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.No comments:

Post a Comment