Thursday, October 4, 2018

वृद्ध महिलेवर हल्ला:सोळा तोळ्यांचे दागिने लुटले


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील घाटगेवाडी रोडवर दुधाळवस्ती येथे  एकटीच राहाणाऱ्या यल्लवा गोपीनाथ वाघमारे या साठ वर्षाच्या महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोळा टोळ्यांचे दागिने घेऊन एका महिलेने पोबारा केल्याची खळबळजनक  घटना आज गुरुवारी दुपारी घडली. लीलावती ऐनापुरे असे संशयीत महिलेचे नाव असून या प्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, यल्लव्वा वाघमारे या एकटीच दुधाळवस्तीवरील आपल्या मालकीच्या घरात राहतात. त्यांचे आणखी एक घर लगतच असून त्यांनी ते विकायला काढले आहे.
दरम्यान, यल्लव्वा या दोन दिवसांपूर्वी आजारी असल्याने डॉ. आरळी यांच्या दवाखान्यात उपचारांसाठी दाखल झाल्या होत्या. तेव्हा लीलावती ऐनापुरे नावाची महिलाही तिथे होती. दोघींची ओळख झाली. या महिलेने वृद्ध महिलेला आजारपणात मदतही केली. यावेळी त्यांनी आपले घर विकायचे आहे, असे या महिलेला सांगितले होते. शिवाय आपला मुलगा कामानिमित्त मुंबईला स्थायिक झाला आहे, असेही सांगितले होते.
आज गुरुवारी दुपारी लीलावती ऐनापुरे नावाची महिला घराची चौकशी करत यल्लव्वा यांच्याकडे आली होती. घर विकत घेणार असल्याचा बहाणा करून ती त्यांच्याशी बोलत राहिली. नंतर घरात कोणी नसल्याचे पाहून तिने खुर्चीत बसलेल्या वृद्ध यल्लव्वा यांच्या पाठीमागे जाऊन ओढणीने गळा आवळला. यावेळी डोघीत झटापट झाली. मात्र सदर महिलेने मारहाण करत गळा आवळण्याचा प्रयत्न केला,यात त्या बेशुद्ध पडल्या. याचा फायदा घेत सदर संशयीत महिलेने त्यांच्या गळ्यातील  व हातातील दागिने हिसडा मारून ओढून घेतले व पोबारा केला. यात हातातल्या नऊ तोळ्यांच्या पाटल्या,झुबे एक तोळे,गंठण चार तोळे,लहान गंठण दोन तोळे असा सुमारे सोळा तोळ्यांचा
 मुद्देमाल लंपास केला. घरातील बाकी कुठल्याही वस्तूला हात लावला नाही.
ही घटना दुपारी एकच्या दरम्यान घडली. वृद्ध महिलेला शुद्ध सायंकाळी पाच वाजता आली. नंतर त्यांनी फोनवरून मोरे कॉलनीत राहाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले. जत ग्रामीण रूग्णालयात उपचार घेऊन पोलिसांत फिर्याद दिली.या महिलेने आपले गाव पाच्छापूर असल्याचे सांगितले होते.मोबाइल नंबर दिला होता.तसेच दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज याद्वारा तपास सुरू आहे.


No comments:

Post a Comment