Tuesday, October 16, 2018

वाहन चालक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण पाथरुट


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी जत येथील प्रवीण पाथरुट यांनी नुकतीच निवड झाली आहे. या संस्थेच्या जत येथे झालेल्या मेळाव्यात ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी श्री. पाथरुट यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री. पाथरुट म्हणाले,वाहन चालकांना सध्याच्या परिस्थितीत अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळा अपघाताच्या घटनेत वाहन चालकाची चूक नसतानादेखील जमावाकडून मारहाण केली जाते. पोलिसांकडूनही सतत अडवणूक केली जाते. त्यातच महागाईने डोके वर काढल्याने वाहन चालकांचा व्यवसाय कमी आला आहे. या सगळ्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी संघटनेची गरज आहे. संघटीत राहिल्याशिवाय न्याय मिळत नाही. संघटनेमुळे रस्त्यात वाहन बंद पडल्यास मदत मिळू शकते, यासाठी संघटना प्रयत्न करीत आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू आणि वाहन चालकांना न्याय मिळवून देऊ.
संस्थापक अध्यक्ष श्री. हाळनोर म्हणाले, संघटनेचा विस्तार करून संपूर्ण देशभरातील वाहन चालक संघटीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे.
जत येथे झालेल्या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्र महासचिव मुकेश मोहिते, जिल्हाध्यक्ष महादेव शिंत्रे, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, प्रशांत घोगरे यांच्यासह सांगली, सोलापूर जिल्ह्यातील वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment