Friday, October 12, 2018

आगामी वर्ष कुक्कूटपालन वर्ष साजरे करणार : जानकर


जत,(प्रतिनिधी)-
येणारे 2019 हे वर्ष राज्य शासनाच्या वतीने कुक्कूटपालन वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेतकर्याचा मुलगा उद्योगपती व्हायला हवा, अशी अपेक्षा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
पशुसंवर्धन मंत्री जानकर म्हणाले, ‘पोषणाच्या बाबतीत आईच्या दुधानंतर अंड्यामधील प्रथिनांचा क्रमांक लागतो. अंड्यातील प्रथिने ही दूध व मांस यापेक्षा पचनास हलकी असतात आणि सर्व वयोगटांतील लोकांना सहज पचतात. आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातही अंड्यांची सोय करण्यात येईल. राज्यामध्ये सध्या दीड कोटी अंडी उत्पादन होते. राज्याची अंड्यांची गरज तीन कोटींची आहे, उर्वरित अंडी आंध्र प्रदेश, तेलंगाणा राज्याकडून विकत घेतली जातात.’ राज्यामध्येच अंडी उत्पादन वाढवण्याची मोठी संधी असून, शेतकर्यांनी कुक्कूटपालनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
सन 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. पशुसंवर्धन, कुक्कूटपालन या व्यवसायांमध्ये हे उत्पन्न चारपट करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितले. कुक्कूटपालन, सेंद्रिय खाद्य निर्मिती, विक्री व्यवस्थापन यांचे नियोजन केल्यास अंडीविक्रीसाठी जागतिक बाजारपेठ खुली असल्याचे सांगितले. अरब देशांचे इंडो-अरब फोरम लवकरच स्थापन करण्यात येणार असून, त्या माध्यमातून 28 देशांमध्ये अंड्यांची जास्तीत जास्त विक्री होऊ शकते,असेही ते म्हणाले. मानवी आहारात अंड्यांच्या पोषणमूल्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आणि कुक्कूटपालन व्यवसायाला चालना देऊन ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी जागतिक अंडी दिन साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अंडे हे शाकाहारी असल्याने, प्रत्येकाने आहारात समावेश करण्यास हरकत नसल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment