Tuesday, October 2, 2018

आमदार जगताप यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

व्हसपेठ-चडचण रस्त्याचे काम निकृष्ट; अंदाजपत्रकाप्रमाणे काम करा
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्व भागात सुरू असलेले व्हसपेठ- चडचण रस्ता रुंदीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने  आमदार विलासराव जगताप यांनी याची  गंभीर दखल घेतली व  सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. प्रत्यक्ष कामावर थांबून  अंदाजपत्रकाप्रमाणे काम करून घेण्याच्या सक्त सूचना दिल्या.
    कर्नाटकातील चडचण हद्दीपासून ते व्हसपेठ डोंगरापर्यंत मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत साडेसोळा कोटीचे काम मंजूर आहे. या मंजूर  रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू आहे. रस्ता रुंदवणे व  डांबरीकरण करणे असे या कामाचे  स्वरूप आहे. चडचण  हद्दीपासून ते  सोन्याळ जवळील नदाफ फाट्यापर्यंत  रस्ता रुंदवण्याचे काम अंतिम टप्प्यात  आले आहे.उर्वरित काम बाकी आहे.इस्टीमेटप्रमाणे काम करण्यात येऊन कामाची गुणवत्ता राखणे अपेक्षित होते. परंतु कामाचा दर्जा अतिशय सुमार होताना दिसत आहे. हा रस्ता रुंदवताना दोन्ही बाजूला  खोली व रुंदीत फरक करण्यात येत आहे. रुंदावलेल्या खड्ड्यात  प्रमाणात खडी व खडीबरोबर  उत्तम प्रतीचे मुरूम टाकणे आवश्यक असताना  रस्त्याकडेची माती गोळा करून तर काही ठिकाणी चर खोदून  चक्क माती टाकण्यात येत आहे.खडीमध्ये माती मिसळून व जुजबी पद्धतीने पाणी मारून रोलर फिरवले जात आहे.
     माती मिसळून काम  होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. हा तालुक्यातील महत्वाचा रस्ता आहे. कित्येक वर्षांनंतर एवढ्या मोठया प्रमाणात निधी देण्यात आला आहे. या रस्ता कामासाठी साडेसोळा कोटी खर्च होत असताना या कामाकडे कुणाचेच कसे  काय लक्ष नाही ? असा सवाल केला जात होता. चक्क माती टाकून रस्त्याचे काम पूर्ण करताना  या कामावरील संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने असे निकृष्ट काम होत असल्याचा आरोप होत होता.
या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या कडून तक्रारी वाढल्यानंतर आमदार विलासराव जगताप यांनी याबाबत गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन चांगलीच खरडपट्टी काढली.  तसेच रस्त्याच्या झालेल्या कामाबाबत आढावा घेऊन रस्त्याच्या कामाची दर्जा उत्तम राखण्याचे सक्त सूचना दिल्या. प्रत्यक्ष कामावर थांबून काम करून घेण्यास सांगितले. व्हसपेठकडूनही कामाला सुरुवात करावी व कामाला गती द्यावी तसेच कामाबाबत दक्ष राहून  अंदाजपत्रकाप्रमाणे काम घ्या. तसे  न झाल्यास कारवाईला  सामोरे जावे लागेल,असा इशारा दिला.

No comments:

Post a Comment