Tuesday, October 2, 2018

पुन्हा एकदा शेतकरी जुगार खेळायला तयार


निसर्गाच्या भरवशावर पेरण्या सुरू;वाढलेल्या डिझेलच्या दराचा परिणाम पेरणीवर
जत,(प्रतिनिधी)-
खरिप वाया गेल्याने हतबल झालेला शेतकरी परवाच्या एका पावसावरच रब्बी ज्वारीच्या पेरण्या करू लागला आहे. निसर्गाच्या भरवशावर पुन्हा एकदा शेतकरी जुगार खेळू लागला आहे. सध्या जतच्या डोण परिसरासह काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. तर काही ठिकाणी त्याची तयारी चालली आहे. पण एका पावसानंतर पाऊस गुल झाला असून सगळ्यांना त्यामुळे चिंता लागून राहिली आहे.
दरम्यान, वाढत्या इंधन दराचा आर्थिक फटका यंदाच्या पेरणीला बसत असून ट्रॅक्टरमालकांनी पेरणीचे दर वाढवले आहेत. सध्या प्रतिएकर 600 ते 800 रुपये ट्रॅक्टरचा पेरणी दर आहे. पूर्वीचा हाच दर 400 रुपये होता. अलिकडे सर्वत्र ट्रॅक्टरद्वाराच पेरणी केली जात असल्याने आधीच शेतकर्यांकडे पैसे नाहीत, त्यात वाढत्या महागाईने शेतकरी वैतागून गेला आहे. पैसे तरी कोठून आणायचे, असा त्यांचा सवाल आहे. यामुळे सावकारीला खतपाणी घातले जात असून शेतकर्याला त्याच्या घराची पायरी चढण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

जत तालुक्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सुमारे 65 हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होते. परवा एक दिवस तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने ज्वारीच्या पेरणीला लागला आहे. मात्र त्यानंतर पाच दिवस झाले पाऊस गायबच झाला आहे. एकिकडे शेतकरी पेरणीच्या मार्गाला लागला असताना दुसरीकडे पावसाने दांडी मारल्याने शेतकरी पुरता हबकला आहे.पण शेवटी निसर्गाच्या भरवशावर पेरण्यांना प्रारंभ केला असून काही ठिकाणी त्याची जोरदार तयारी सुरू आहे.
पावसाचे चारही महिने असेच पावसाविना गेल्याने आता सर्वांची मदार परतीच्या पावसावर आहे. खरिप हातालाच लागला नाही. निदान रब्बी तरी आपलं जिणं सुसह्य करेल का, याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. मागच्यावेळेचा खर्च असाच वायफट गेला. आताही तसाच प्रकार झाला तर मात्र शेतकर्यांचे दिवाळे वाजल्याशिवाय राहत नाही. पण याची कल्पना असतानाही तो जुगार खेळायला तयार झाला असून शेतकर्यांनी रब्बी ज्वारीच्या पेरण्या करू लागला आहे.
प्रामुख्याने उत्तरा नक्षत्रामध्ये प्रतिवर्षी पेरण्या होत असतात. यंदा सर्वच नक्षत्रे कोरडी गेल्याने जमिनीमध्ये पेरणीलायक ओल नाही. परिणामी शेतकरी मोठ्या पावसाची प्रतिक्षा करीत आहे. सध्या हस्त नक्षत्र सुरू असून यामध्ये म्हैस वाहन आहे. हे पावसाचे शेवटचे नक्षत्र आहे. या नक्षत्रात बिनभरोशाचा पाऊस असतो. पडला तर पडतो अन्यथा नाही. उत्तरा नक्षत्रात परतीचा पाऊस पडत असल्याने हे नक्षत्र शाश्वत असते. पण यंदा याही नक्षत्राने धोका दिला आहे. पावसापेक्षा वार्याचे प्रमाण अधिक असल्याने आकाशात आलेले ढग या वादळाने पुढे निघून जातात. परिणामी पाऊस पडत नाही. असे दैनंदिन चित्र मागील तीन महिन्यांपासून आहे. शेतकर्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली आहे,पण शश्वती देता येत नाही. जमीन पडीक कशी ठेवायची, या सतावणार्या प्रश्नामुळे शेतकरी पेरण्या करू लागला आहे

No comments:

Post a Comment