Saturday, October 20, 2018

जत तालुक्यातील भारनियमन, वीजदरवाढ कमी करा

उत्तम चव्हाण यांची मागणी
जत, (प्रतिनिधी)-
जत तालुक्यात वीज वितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन त्वरीत बंद करावे अन्यथा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण यांनी दिला आहे.याबाबतीतचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या जत शाखेला देण्यात आले आहे. वीज दरवाढही  मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण जनता, शेतकरी प्रचंड महागाईमुळे होरपूळून निघत आहे.त्यातच यावर्षी जत  तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेला आहे.याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. त्यातच वीज दरवाढ झाल्याने आगीत तेल ओतण्याचा प्रकार झाला आहे. लोकांना जगणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सरकारने केलेली वीज दरवाढ आणि भारनियमन माघारी घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
एका बाजूला भारनियमन करायचे आणि दुसऱ्या बाजूला वीज दरवाढ करायची याच्याने सामान्य माणूस आणि शेतकरी यांनी जगूच नये,  अशी व्यवस्थाच सरकारने करून ठेवली आहे. मुळात नागरिक विजेचा कमी वापर करून काटकसर करत आहेत.असे असतानाही त्यांच्यावर वीज दरवाढीचे ओझे टाकण्यात आले आहे.हा लोकांवर अन्याय आहे.हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.
वीज दरवाढीमुळे आणि वाढलेल्या महागाईमुळे सर्व सामान्य, मध्यमवर्गीय यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे मागील दोन वर्षातील वित्तीय तूट भरून काढण्यासाठी तेवीस टक्के दरवाढीची मागणी केली होती.मात्र आयोगाने पंधरा टक्के  दरवाढीला सप्टेंबर महिन्यात मान्यता दिली आहे.यापैकी  सहा टक्के दरवाढ केली असून त्या माध्यमातून महसुली तूट भरून काढण्याचा प्रयत्न आहे.उर्वरित  नऊ टक्के दरवाढ येणे बाकी असून ती नंतर वाढवण्यात येणार आहे. अशा प्रकारे सर्व सामान्यांना व शेतकऱ्यांना सरकार आणि वीज वितरण कंपनीचा लुटण्याचा हा डाव आहे. हा डाव आम्ही हाणून पाडू.सरकारने भारनियमन आणि वीज दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी, अन्यथा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment