Thursday, October 18, 2018

जतमध्ये शिक्षकांसाठी बहुउद्देशीय सभागृह उभारण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात 1 हजार 200 च्यावर प्राथमिक शिक्षक संख्या आणि 470 च्या आसपास शाळा आहेत. अनेकदा सर्व शिक्षक किंवा मुख्याध्यापकांच्या एकत्रित बैठका बोलवल्या जातात,मात्र जतमध्ये अशी एकही इमारत नाही, जिथे सर्व शिक्षक बसू शकतील. त्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला खासगी शाळांपुढे हात पसरावे लागतात. या शाळा सहकार्य करीत नसल्याने शिक्षकांना जागा उपलब्ध होईल, तिथे भारतीय बैठक मारून सभा उरकावी लागते. यासाठी जिल्हा परिषदेने तालुकास्तरावर बहुउद्देशीय सभागृह बांधावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
ग्रंथ व विज्ञान प्रदर्शन, विविध स्पर्धा, शिक्षकांच्या बैठका घेण्यासाठी  जतमध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे इमारत उपलब्ध नाही. तालुक्यात शिक्षकांची संख्या मोठी आहे. त्यांची एकत्रित बैठक बोलावता येत नाही. त्यामुळे या बैठका जतसह माडग्याळ किंवा संख येथे बोलवाव्या लागतात. यासाठी वेळ खर्ची पडतो. मार्गदर्शन करणार्यांची संख्या अपुरी असल्याने अडचण निर्माण होते. जतमधल्या खासगी शाळांकडे अशा इमारती असल्या तरी या शाळा शिक्षण विभागाला सहकार्य करत नाहीत. काही ठिकाणी त्यांचेच विद्यार्थ्यांचे वर्ग भरत असल्याने अशा प्रकारची ऐसपैस जागा जतमध्ये उपलब्ध नाही. कित्येकदा शिक्षकांना जागा मिळेल तिथे भारतीय बैठक मारून सभा उरकाव्या लागतात. सकाळी 11 ते 5 इतका कालावधी बसून सभेचे काम करणे कठीण आहे. अनेकांना मुळव्याध, गुडघेदुखीसह अन्य आजार आहेत.काहींच्या पायांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अशी अडचण असतानाही या शिक्षकांना बैठक मारून बसावे लागत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
शिक्षक काही लहान मुले नाहीत की त्यांना भारतीय बैठक मारून सहा सहा तास बसवावे. शिक्षण विभागाचा नाईलाज असल्याने शिक्षकही गप्प राहत आहेत. मात्र यासाठी बहुउद्देशीय सभागृहाची आवश्यकता आहे. तालुकास्तरीय विविध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन असे अनेक उपक्रम वर्षभर चालत असतात. खासगी शाळा आपल्या इमारती उपलब्ध करून देत नाहीत. अनेकदा शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना या खासगी शाळांपुढे गयावया करावी लागते. ही समस्या सुटण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बहुउद्देशीय मोठे सभागृह उभारावे व शिक्षण विभागाची अडचण दूर करावी अशी मागणी होत आहे.



No comments:

Post a Comment