Friday, October 19, 2018

तीन चिमुरड्यांसह महिलेची विहिरीत उडी मारून आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
कौटूंबिक वादातून जत येथील राधिका सुभाष कोळी (वय 32) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तब्बल चार तासानंतर शर्थीचे प्रयत्न करून सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने जत शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून हळहळही व्यक्त करण्यात येत आहे.
      राधिका कोळी यांच्यासह प्रज्ज्वल (वय 4), आराध्या (वय 3) आणि यश (4 महिने) अशी मृत चौघांची नावे आहेत. राधिका कोळी या कुटूंबासह जतमधील मंगळवार पेठेतील कोळी गल्लीत राहत होत्या. त्यांच्या पतीचा बांधकामावर लिफ्ट पुरविण्याचा व्यवसाय आहे. राधिका यांचे सोलापूर जिल्ह्यातील माहेर असून सात वर्षापूर्वी त्यांचा सुभाष कोळी यांच्याशी विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यापासून कौटूंबिक कारणावरुन राधिका व सुभाष यांच्यात वाद सुरु होते. गुरुवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातूनच राधिका या आपल्या तीनही  मुलांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घरातून बाहेर पडल्या. पतीने नंतर त्यांची शोधाशोध सुरू केली, पण राधिका व मुलांचा सुगावा लागला नाही.
    सुभाष यांच्यासह आणखी काही नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी शहरात सर्वत्र शोध सुरू केला. संशय म्हणून त्यांनी जत शहराला पाणी पुरवठा करणार्या यल्लमा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतही डोकावून पाहिले. यावेळी त्यांना यश या चार महिन्याच्या चिमुरड्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावरुन राधाने मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय बळावला. यानंतर जत पोलीस, स्थानिक नागरिक व नगरपालिका यांनी संयुक्तपणे मोहिम राबवून राधिका व अन्य दोघांचा शोध सुरू केला. पंचवीस-तीस फूट विहीर असल्याने आणि उतरायला पायर्या नसल्याने शोध कार्यात अडथळा येत होता. तरीही धाडसाने अण्णासाहेब भिसे, नंदू कांबळे, विशाल कांबळे, अनिल चव्हाण, दीपक चव्हाण, किरण चव्हाण या युवकांनी मृतदेह बाहेर काढले. यासाठी क्रेनचाही वापर करण्यात आला. पहिल्यांदा  साडेअकरा वाजता राधिका यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर आराध्या व प्रज्वल यांचाही मृतदेह सापडला.
महिलेने मुलांसह आत्महत्या केली असल्याची बातमी जत शहरात सकाळी वार्यासारखी पसरली. त्यामुळे विहिरीकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर राधिका यांनी मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
 नगरपालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
    जत शहराला पाणी पुरवठा करणार्या यल्लम्मा पाणी योजनेच्या विहिरीवर सुरक्षा म्हणून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे जत नगरपरिषदेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक उमेश सावंत यांनी केली आहे. दरम्यान, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर आणि उपनगराध्यक्ष पवार यांनी सुरक्षेसाठी विहिरीवर जाळी मारण्यात येईल, असे सांगितले.

No comments:

Post a Comment