Saturday, October 6, 2018

जाडरबोबलादला फुलली ‘ड्रॅगन फूड’ ची लागवड


जत,(प्रतिनिधी)-
ड्रॅगन फूड या औषधी फळाला बाजारात मागणी वाढत असल्याने जतसारख्या  दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणार्या या फळाची लागवड तालुक्यात वाढू लागली आहे. जत तालुक्यातील जाडरबोबलादमधील शेतकरी सिध्दान्ना आराणी यांनीही ड्रॅगन फुडची लागवड केली असून ते सध्या  वर्षाला एकरी  5 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
 दुष्काळी जत तालुक्यात कमी पाण्यावर ही बाग उभारता येत असल्याकारणाने गेल्या पाच-सहा वर्षात तालुक्यात ड्रॅगनचे क्षेत्र वाढू लागले आहे. सध्या 11 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. बेंगलुरू,पुणे, मुंबई,जयपूर आदी भागात ड्रॅगनला मोठी मागणी असून दरही चांगला मिळत आहे. विशेष म्हणजे पूर्ण उन्हाळ्यात सुध्दा या बागेला कमी पाणी कमी लागते. सध्या वातावरण बदल, व्हायरल इन्फेक्शन आदी कारणांमुळे माणूस आजारी पडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे, तसे ड्रॅगन फूडची मागणीही वाढली आहे.
 माणसाच्या शरिरातील  पांढर्या पेशी कमी झाल्यावर डॉक्टर मंडळी हे फळ खाण्याचे आग्रह धरतात. हे फळाच्या सेवनाने अंगातील पांढर्या पेशी वाढतात, अशी धारणा आहे. त्याचबरोबर हे फळ गोड असल्याने एक फळ कमीत कमी 70 ते 80 रुपयाला विकले जाते. डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया व हृदय रोगावर हे फळ चांगले आहे. हे फळ चेतासंस्थेसाठी लाभदायक आहे, तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राखते, त्याच बरोबर जखमा लवकर भरून येतात. हाडेही बळकट होतात. शरीराची प्रतिकार क्षमता वाढविते, याबरोबरच कर्करोगाला प्रतिबंध करते. त्यामुळे या फळाला सर्वत्र चांगली मागणी आहे. त्यामुळे या फळाची लागवड करण्यास उपयुक्त आहे. दुष्काळी भागात कमी पाण्यावर हे फळ येत असल्यामुळे जत तालुक्यातील युवकांनी शेतीकडे लक्ष देउन ड्रॅगन फूडची बाग लावावी, असे आवाहन प्रगतशील शेतकरी आराणी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment