Saturday, October 13, 2018

ज्या शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी जायचे नाही,त्यांची बदली रद्द

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन पद्धतीने झाल्या आहेत. मागील दोन वर्षात जवळपास आठ हजार 500 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. पण, काही शिक्षकांच्या इच्छेनुसार बदल्या होऊनही कौटुंबिक अडचणींमुळे त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदली नको आहे. अशा गुरुजींची बदली रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे गैरसोय झालेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
    ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या झाल्याने अनेक गुरुजींची सोय झाली आहे. अनेक वर्ष बाहेरील जिल्ह्यात सेवा केल्यानंतर स्वजिल्ह्यात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. काही शिक्षकांच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या आहेत. मात्र, कौटुंबिक कारणामुळे किंवा त्यांच्या जोडीदाराची बदली न झाल्याने त्या गुरुजींनी आंतरजिल्हा बदली रद्दची मागणी केली आहे. अशा गुरुजींची बदली रद्द करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
     ज्या शिक्षकाने आंतरजिल्हा बदली रद्दची मागणी केली आहे, त्या शिक्षकाला कार्यमुक्त केले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे. त्यांना कार्यमुक्त न करता त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश काढावेत. गुरुजींना कार्यमुक्त केले असल्यास व त्यांना बदली नको असल्यास संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्या शिक्षकाला परत जायचे असेल तर तो शिक्षक धारण करत असलेल्या प्रवर्गाची जागा रिक्त असणे आवश्‍यक आहे. एकदा शिक्षकाने आंतरजिल्हा बदली रद्द केली असल्यास त्याला पुन्हा पाच वर्ष बदली मागता येणार नाही. पाच वर्षानंतर त्या गुरुजींना त्यांच्या जिल्ह्यात पाठविले तरी त्यांची सेवाज्येष्ठता बाधित होणार नसल्याच्या सूचनाही ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.
     ज्या शिक्षकांनी बदली रद्दची मागणी केली आहे, त्या शिक्षकांची सगळी प्रक्रिया ही दिवाळीच्या सुटीमध्ये पूर्ण करण्याच्या सूचनाही ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर दुसरे सत्र होत असल्यामुळे शिक्षण प्रक्रियेमध्ये अडथळा येणार नाही.

No comments:

Post a Comment