Sunday, October 21, 2018

शिक्षकांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढा

प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा प्राथमिक शिक्षक सम्घाने प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांची सांगली जिल्हा परिषदेत भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही श्री. राऊत यांनी दिली. याचवेळी संबंधित विभागातील खातेप्रमुखांना बोलावून तशा तातडीने सूचनाही दिल्या.यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, शार्दुल पाटील, एम.वाय.पाटील उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे म्हणाले, परजिल्ह्यांतून सांगली जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांचा परिवीक्षाधीन कालावधी मंजूर होण्याबाबत शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यात सुधारणा करावी. वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी लागणार्या प्रशिक्षणामध्ये सूट देण्यात यावी. प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीवर संबंधित शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करावी. विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात याची. शिराळ्यासह काही तालुक्यातील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाचा चौथा हफ्ता आहरणीय रकमेत वर्ग व्हावा. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, वरिष्ठ मुख्याध्यापक, विषय शिक्षक या पदांसाठी पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यावी. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची अंशदान पेन्शन योजनेमध्ये झालेली कपात परत द्यावी आणि दिवाळीच्या सुट्टीपूर्वी पगार करावेत, अशी मागणी केली आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित खातेप्रमुखांना तसे त्यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न लवकर सुटतील, अशी आशा श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. शिष्टमंडळात अविनाश गुरव, हंबीरराव पवार, अरुण पाटील, पोपट सूर्यवंशी, सलीम मुल्ला, शामगोंडा पाटील, खाजसो शेख, मोहन माने, देवाप्पा करांडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment